आपले पुढील पंख बसताना उभे ठेवून बसण्याच्या डार्ट फुलपाखरांच्या विशिष्ट लकबीमुळे आणि हवेत जोरात सूर मारून उडण्याच्या सवयीमुळे ही फुलपाखरे पटकन ओळखता येतात.

फुलपाखरांचे पुढचे आणि मागचे दोन्ही पंख वरच्या बाजूला गडद चॉकलेटी रंगाचे असतात आणि त्यावर हळदीसारख्या पिवळ्या रंगाचे मोठे ठिपके असतात. पंखांची खालची बाजू ही पिवळ्या रंगाची असते. सदर्न ग्रास डार्ट फुलपाखरू आपल्या नावाप्रमाणेच गवतावरच जास्त आढळते. हे गवत अगदी आपले देशी असो की आयात केलेले परदेशी, सर्व प्रकारच्या गवतावर ही फुलपाखरे अंडी घालतात.

अंडय़ांमधून बाहेर येणारी अळी याच गवताच्या पानावर वाढते. त्यामुळे अगदी डोंगराच्या माळावरचे गवत किंवा शहरी बागेतील लॉनवरही ही

फुलपाखरे सर्वकाळ पाहायला मिळतात. यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे भाताच्या खाचरांमध्येही भाताच्या उभ्या पिकांच्या पातींवर या फुलपाखरांच्या अळ्या पोट भरतात, म्हणजे एक प्रकारे ही फुलपाखरे भातावरची कीड आहेत.

आपल्या सह्य़ाद्रीच्या भरपूर पावसाच्या प्रदेशात पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात जेव्हा सगळीकडे हिरवाई असते, अशा वेळी आणि अशा सर्व ठिकाणी सदर्न ग्रास डार्ट नक्की बघायला मिळते.