वसईतील साहित्य जल्लोष कार्यक्रमात जयंत पवार यांचे प्रतिपादन

मोठमोठय़ा साहित्य संमेलनातून केवळ बडेजाव आणि दिखाऊपणा अधिक होताना दिसतो. मूळ उद्देश बाजूला राहून केवळ सादरीकरणाच्या देखाव्यावरच अशा संमेलनात जोर दिसून येतो, मात्र मर्यादित व्याप्तीच्या म्हणजेच छोटय़ा संमेलनातून खऱ्या अर्थाने विचारांची देवाण-घेवाण होते. त्यातूनच वाचक घडू शकतात. असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी वसईत आयोजित साहित्य जल्लोष कार्यक्रमात व्यक्त केले.

[jwplayer 8cIf7m5X]

वसई-विरार शहर महानगरपालिका (ग्रंथालय विभाग) आणि  साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्य जल्लोष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसईतील अनंतराव ठाकूर नाटय़गृहात रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांच्या हस्ते झाले, तर अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती सीएस थूळ आणि महापौर प्रवीणा ठाकूर उपस्थित होत्या. यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी बोलताना जयंत पवार पुढे म्हणाले, साहित्य, लेखक, कवी यांच्याविषयी परखड भूमिका मांडताना कोणत्याही राज्याच्या विकासाचा आलेख किंवा प्रगती ही केवळ भौतिकपणावर मोजता येत नाही. तिची साहित्यिक, सांस्कृतिक प्रगती किती झाली यावरच विकासाचा खरा मापदंड ठरवता येतो. टीका आणि गळचेपी करणारे मोकळे राहतात आणि न्याय देणारे व शासन म्हणून सरकार टीकाकारांच्या पाठीशी राहतात. म्हणूनच लेखकांची कोंडी होते.

आजचा लेखक मोकळेपणाने लिहू शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. साहित्य म्हणजे रसिकता, कल्पकता यांचा सुरेल संगम. साहित्य कला आणि नाटकांमुळेच वाचकांमधील माणूसपण जिवंत असल्याचे अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी सांगितले. या वेळी त्यांनी वसईकर कलावंत मा. दत्ताराम गोव्यातील ‘मत्स्यगंधा’ नाटकातील भीष्माची भूमिका साकारताना आलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. तर ‘वस्त्रहरण’च्या लंडनवारीत घडलेल्या मनोरंजक आठवणी सांगून रसिकांना हसवून वातावरणात उत्साह आणला. तसेच वसई-विरार महानगरपालिका महापौर प्रवीणा ठाकूर यांनी वसईत बहुभाषिक साहित्यप्रेमींसाठी बहुभाषिक साहित्य जल्लोष साजरा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी केले.  अशोक मुळे यांनी आभारप्रदर्शन केले.

साहित्याची ग्रंथदिंडी

उद्घाटनापूर्वी सकाळी चिमाजी अप्पा मैदान ते अनंतराव ठाकूर नाटय़गृहपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये ढोल ताशा, लेझीम पथक, भजनी मंडळ आणि शालेय विद्यार्थी साहित्याचा जागर करत उत्साहाने सहभागी झाले होते. यांच्यासह नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाटककार जयंत पवार, अशोक मुळे, प्राचार्य पु. द. कोडोलीकर, लेखिका सिसिलिया काव्‍‌र्हालो, सभापती नितीन राऊत, प्रवीण शेट्टी, आजीव पाटील आदी मंडळींनी सहभाग घेतला होता.

[jwplayer zkvFlBpu]