कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कल्याण डोंबिवली पालिकेचा दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ वाहने उभी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या वाहनतळावरील वाहनांचे नियोजन करण्यासाठी एक खासगी संस्था नियुक्त केली आहे. हे वाहनतळ दोन दिवसात नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी खुले करण्यात येत आहे, असे मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मुरबाड रस्ता ते वल्लीपीर रस्ता दरम्यान उड्डाण पूल उभारणीचे काम चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. या पुलाच्या कामात दिलीप कपोते वाहनतळ अडसर येत होते. त्यामुळे हे वाहनतळ तोडून बाजु्च्या जागेत नव्याने उभारण्यात आले. कपोते वाहनतळावर मुंबई, नाशिककडे नोकरीला जाणाऱ्या कल्याण सह मुरबाड, भिवंडी परिसरातील नोकरदारांची वाहने उभी राहत होती. वाहनतळ तोडल्यानंतर या प्रवाशांना परिसरातील रस्त्यांवर वाहने उभे करून जावे लागत होते. ती अडचण आता दूर झाली आहे.

हेही वाचा – आधी डोक्याला चटके, मग मिळते लोकल; बदलापूर रेल्वे स्थानकात छप्पराअभावी प्रवाशांना उन्हाच्या झळा

वाहनतळ सज्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी कपोते वाहनतळाचे उद्घाटन करण्यात आले. सात मजली असलेल्या या वाहनतळावर बाराशे दुचाकी उभ्या करण्याची क्षमता आहे. मे. किंजल ग्रुपने कपोते वाहनतळाची सुसज्ज इमारत उभारणीचे काम पूर्ण केले आहे. ५७६ कोटींच्या सॅटीस प्रकल्प उभारणीच्या निधीतून हे काम करण्यात आले आहे. वाहनतळ सुरू झाल्यामुळे मागील तीन ते चार वर्ष कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात जो वाहन कोंडीचा प्रश्न होता, तो दूर होण्यास मदत होईल. कल्याण पश्चिमेत दररोज १० लाख वाहने धावत असतात. वाहनतळ, उड्डाण पुलामुळे ही कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे, असे मे. किंजल ग्रुपचे अध्यक्ष हिरालाल दोशी यांनी सांगितले.

कपोते वाहनतळ सुरू झाल्यानंतर कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर सम, विषम तारखेला दुचाकी वाहने उभी केली जात होती. तो प्रकार आता बंद होईल. रेल्वे स्थानक परिसर प्रवासासाठी मोकळा होईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा सौरयंत्रणेवर सुरु

दिलीप कपोते वाहनतळ देखभालीचे काम एका संस्थेला दिले आहे. या संस्थेकडून दोन दिवसात तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की कामाचे आदेश देऊन कपोते वाहनतळ पूर्ण क्षमतेने सुरू केला जाणार आहे. ठेकेदाराकडून वाहनतळ सुरू करण्यास विलंब झाला तर पालिका कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने वाहनतळ सुरू करण्याचे नियोजन केले आहे. – वंदना गुळवे, उपायुक्त, मालमत्ता विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapote parking lot near kalyan west railway station is ready for vehicles ssb