मुंब्रा येथील किस्मत कॉलनी परिसरातील नूरजहाँ इमारतीचे बांधकाम उच्च न्यायालयाच्या आदेशाने पाडण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने गुरुवार सकाळपासून हाती घेतली होती. मात्र, या इमारतीमधील सुमारे ३० हून अधिक महिलांनी अंगावर रॉकेल ओतून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेचे पथक कारवाईसाठी पुढे सरसावले असता रहिवाशांनी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगावर रॉकेल फेकल्याचा प्रकार घडला. अखेर इमारतीमधील १३ व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई करून पालिकेच्या पथकास माघारी परतावे लागले. या घटनेमुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
मुंब्य्रातील किस्मत कॉलनीमध्ये नूरजहाँ इमारत असून ती सात मजल्यांची आहे. या इमारतीमध्ये १४ गाळे आणि ४४ घरे आहेत. जागामालक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये जागेवरून वाद सुरू होता. या वादातूनच उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने इमारत तोडण्याचे आदेश महापालिकेस दिले होते.
त्यानुसार या इमारतीचे बांधकाम पाडण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने गुरुवार सकाळपासून हाती घेतली होती.