भगवान मंडलिक, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण – शिवसेनेतून फारकत घेऊन बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभेवर महाविकास आघडीचाच (शिवसेनेचा) उमेदवार निवडून येईल. यापूर्वी शिवसेनेतून घेतलेल्या फारकतीचा धडा त्यांना शिकवला जाईल, असे आव्हान पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दोन महिन्यापूर्वी कल्याणमधील दौऱ्याच्यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेला दिले होते. आता लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही महाविकास आघाडीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार जाहीर होत नसल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कल्याण लोकसभेसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या तगड्या उमेदवाराला शह देण्यासाठी तेवढ्याच तोलामोलाचा उमेदवार महाविकास आघाडीकडून देणे गरजेचे आहे, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. प्रचाराची वेळ आली तरी महाविकास आघाडीकडून कल्याण लोकसभेचा उमेदवार निश्चित होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील कोळे गावात गावठी दारूचा साठा जप्त; दारूसाठी काळ्या गुळाला बाजारात मागणी

शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुत्र खासदार डाॅ. शिंदे यांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याची लोकसभा निवडणूक ही पहिलीच संधी असल्याने कल्याण लोकसभेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक महाविकास आघाडीकडून जाहीर उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सज्ज आहेत.

चर्चेतील नावे

कल्याण लोकसभेसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेनेचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, सुषमा अंधारे यांची नावे घेतली जात आहेत. याशिवाय युवा नेते आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई यांचीही नावे घेतली जात आहेत. आदित्य ठाकरे हे तारांकित प्रचारक असल्याने त्यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी गुंतवून ठेवणे कितपय योग्य आहे, असा प्रश्न करून शिवसेनेेतील वरिष्ठांनी वरूण यांचे नाव पुढे केले असल्याचे समजते. थरवळ हे एकमेव स्थानिक आहेत. अंधारे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाची उभारणी; एक ते पाच क्रमांक फलाटांना जोडणार पादचारी पूल

कार्यकर्त्यांच्या पसंतीचा स्थानिक उमेदवार कल्याण लोकसभेसाठी दिला जाईल. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांत राहून स्थानिक पातळीवर आपली मतदार संपर्काची कामे सुरू ठेवावीत, असे आदेश मातोश्रीवरून कल्याण लोकसभेतील शिवसैनिकांना देण्यात आले आहेत. शिंदे पिता-पुत्रांना धडा शिकवायचा असल्याने महाविकास आघाडीमधून उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील तगडा उमेदवार सर्वानुमते कल्याण लोकसभेसाठी देण्याच्या हालचाली महाविकास आघाडीत सुरू आहेत.

राजू पाटील यांची चाचपणी

श्रीकांत शिंदे यांना आक्रमकपणे शह देईल असा तगडा उमेदवार आता तरी महाविकास आघाडी, ठाकरे यांच्या समोर नसला तरी मनसेतून आयात करून प्रमोद उर्फ राजू पाटील यांना उमेदवारी दण्याची जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या वरिष्ठांकडे केली जात आहे. मनसे म्हणून किंवा अपक्ष म्हणून राजू पाटील यांना प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु, त्यांना महाविकास आघाडीतून दमदार साथ मिळेल, असे कार्यकर्ते सांगतात.

सामान्य शिवसैनिकाला कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीतून कल्याण लोकसभेसाठी अंतीम उमेदवाराचे नाव घोषित झाले की याठिकाणी कार्यकर्ते त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कामाला लागतील. हर्षवर्धन पालांडे-उपजिल्हाप्रमुख, कल्याण पूर्व, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi searching strong candidates for kalyan lok sabha constituency zws
First published on: 19-03-2024 at 12:04 IST