डोंबिवली – डोंबिवली जवळील कोळे गाव हद्दीत मानपाडा पोलिसांच्या गु्न्हे प्रकटीकरण शाखेने रविवारी संध्याकाळी छापा मारून दीड लाखाहून अधिक किमतीचा गावठी दारूचा साठा जप्त केला. हा साठा जागीच नष्ट करण्यात आला.

लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या कालावधीत झोपडपट्टी भागात दारू मोफत वाटून मतदारांना आपल्याकडे ओढण्याचे प्रकार काही राजकीय मंडळी करतात. निवडणुकीच्या काळात दारूची अधिक प्रमाणात चढ्या दराने विक्री होते. याची जाणीव असल्याने दारू उत्पादक गाव परिसरातील जंगलात, अडगळीच्या जागेत रात्रीच्या वेळेत गावठी दारू तयार करण्यासाठी भट्ट्या लावतात.

डोंबिवली, कल्याण जवळील उंबार्ली टेकडी, हेदुटणे, कोळे, मलंग गड डोंगर परिसर, देसई खाडी किनारा भागात गावठी दारू तयार करण्याचे प्रमाण अधिक असते.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाची उभारणी; एक ते पाच क्रमांक फलाटांना जोडणार पादचारी पूल

कोळे गावात समाधान हाॅटेल मागील झाडीमध्ये नीलेश पाटील (२६) याने गावठी दारूचा दीड लाखाहून अधिक किमतीची तयार करून ठेवली आहे. अशी माहिती मानपाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खात्री केल्यानंतर रविवारी संध्याकाळी या भट्टीवर छापा टाकला. तेथील दीड लाखाहून अधिक किमतीची पिंपात साठवून ठेवलेली दारू टिकाव, फावड्यांचे घाव पिंपावर घालून नष्ट केली.

घटनास्थळी दारूचा गूळ, नवसागर, पाणी खेचण्यासाठी मशिन आढळून आली. दारू तयार करण्यासाठी दलदलीतील पाणी वापरले जात होते. असेही पथकाच्या निदर्शनास आले.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाने पोलिसांनी नीलेश पाटील याच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, हवालदार अनिल घुगे, गणेश भोईर, प्रवीण किनरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून तयार गावठी दारू रात्रीच्या वेळेत महागड्या गाड्यांमधून शहरी भागात विक्रीसाठी आणली जाते. यापूर्वी उत्पादन शुल्क विभाग, मानपाडा पोलिसांनी अशाचप्रकारचे साठे जप्त केले होते. डोंबिवली, कल्याण परिसरातील डोंंगर, टेकड्यांवर गर्द झाडीत रात्रीच्या वेळेत दारू भट्ट्या लावण्यासाठी दारू उत्पादकांची मोठी धावपळ सुरू असल्याचे समजते. बाजारातून काळा गूळ खरेदीला मागणी वाढली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.