अंबरनाथ पूर्वेतील वडवली परिसरात शुक्रवारी दुपारी शिवसेना शाखेसमोर सख्या भावांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला आहे. तुषार गुंजाळ असे मृताचे नाव असून त्याचा भाऊ गणेश गुंजाळ हा जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हे गुंजाळ बंधू वडवली शाखेसमोर उभे असताना दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

अंबरनाथ पूर्व भागातील वडवली भागात शिवसेनेची शाखा आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानक आणि आनंद नगर हा रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. नागरी वसाहत असल्याने येथे अनेक दुकाने आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तुषार आणि गणेश गुंजाळ हे दोन बंधू शिवसेना शाखेसमोर रस्त्याच्या पलीकडे उभे असताना अज्ञात हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार आणि हत्यारांनी वार केला. या घटनेत तुषार गुंजाळ याचा गोळी लागल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर गणेश गुंजाळ याच्यावर शस्त्राने हल्ला केल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याचा तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. मात्र व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा होते आहे.