महापालिकेचे ३०० कोटींचे उद्दिष्ट; अखेरचे दोन महिने शिल्लक

वसई : मालमत्ता करवसुलीसाठी पालिकेकडे चालू आर्थिक वर्षांतील केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने मालमत्ता करवसुलीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालिकेने यंदाच्या वर्षीही ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असले तरी त्यापैकी केवळ १६९ कोटींची करवसुली करण्यात आली आहे. उर्वरित मालमत्ता करवसुली करण्यासाठी पालिका विविध प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करून पुढील मालमत्ता कराची वसुली केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

वसई-विरार भागात छोटय़ा-मोठय़ा औद्योगिक वसाहती, उपाहारगृहे, इमारती, सदनिका अशा विविध प्रकारच्या साडेसात लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. यामधील काही मालमत्ताधारकांनी व नामवंत विकासकांनीही पालिकेचा मालमत्ता कर थकविला आहे. त्यांना रीतसर देयके व नोटिसा काढून मालमत्ता करवसूल केला जातो. मात्र तरीही काही मालमत्ताधारक अद्यापही कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याने त्याचा मोठा परिणाम महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने कंबर कसली असून महापालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा, चौकात करथकबाकीदारांचे नामफलक, नळजोडण्या खंडित करणे अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी सुरुवात केली असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. ३०० कोटी उद्दिष्टांपैकी आतापर्यंत १६९ कोटी इतक्या कराची वसुली करण्यात आली असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला अजूनही १३१ कोटी रुपये मालमत्ता कर येणे अपेक्षित आहे. त्यासाठी पालिकेकडे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे करवसुलीचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे.

करवसुलीसाठी रॅली

वसई-विरार महापालिकेच्या मालमत्ता कर भरण्याची ३१ डिसेंबरची मुदत उलटूनही थकबाकीदार कर भरण्यासाठी येत नसल्याने मालमत्ता करवसुलीसाठी पालिका अधिकारी, कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यातर्फे आचोळे प्रभाग समिती ‘डी’मधून दुचाकीवरून रॅली काढण्यात आली होती. ज्या मालमत्ताधारकांची कराची रक्कम थकीत आहे, त्यांनी लवकरात लवकर मालमत्ताकर व पाणीपट्टीकराचा भरणा करावा, असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.

करसंकलन करण्यासाठी पालिकेची पथके

मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी नऊ प्रभागांत पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमार्फत कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकाच्या घरी जाऊन आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी मालमत्ताधारक राहत असलेल्या ठिकाणी दंवडी देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्ती, मोठय़ा रक्कम थकीत असलेल्या नागरिकांचे चौकात नामफलक अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

मालमत्ता करवसुलीचे काम हे सर्व प्रभागांतून युद्धपातळीवर सुरू आहे. यंदाच्या वर्षीही जास्तीत जास्त मालमत्ता कर वसूल कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. जे करभरणा करत नाहीत, त्यांच्यावर वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई केली जात आहे. – विश्वनाथ तळेकर, मालमत्ता करसंकलन अधिकारी