ठाणे :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी नवी मुंबईतील एरोली येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात करताना गणेशाच्या कृपेने नवी मुंबईकर नक्कीच साथ देतील असा विश्वास व्यक्त केला. विचारेंच्या या विधानाचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असून या विधानातून त्यांना नेमके काय सांगायचे होते, असा प्रश्न उपस्थितीत होऊ लागला आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मिरभाईंदर भागात प्रचार करीत आहेत. बुधवारी त्यांनी नवी मुंबईतील एरोली येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली. नवी मुंबईतील नवीन दिघा रेल्वे स्थानक, बेलापूर प्रवासी जेटी, ऐरोली – कटाई मार्ग, घणसोली – ऐरोली जोड रस्ता यासारखे प्रकल्प मार्गी लावण्यात यश मिळवले असल्याचे राजन विचारे यांनी यावेळी म्हटले. गेल्या १० वर्षाच्या विकास कामांचे प्रगती पुस्तक जनतेसमोर ठेवून या निवडणूकीला मी सामोरे जात असल्याचे विचारे यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबईतील एरोली येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात करताना विचारे यांनी गणेशाच्या कृपेने नवी मुंबईकर नक्कीच साथ देतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा >>>…आणि शिंदेच्या सेनेचे नरेश म्हस्के उबाठा गटाच्या शाखेत गेले

नवी मुंबई शहरात भाजप नेते गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी गणेश नाईक यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक हे इच्छूक होते. परंतु महायुतीच्या जागा वाटपात ठाण्याची जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली. यामुळे नाईक कुटुंबियांसह त्यांचे समर्थक नाराज झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक कुटुंबीयांची भेट घेऊन नाराजी दूर केल्याचे समोर आले होते. अशातच विचारे यांनी गणेशाच्या कृपेने नवी मुंबईकर नक्कीच साथ देतील, असे विधान केले असून त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यांना या विधानातून नेमके काय सांगायचे होते, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कटिबध्द

राज्यात महविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तयार केला. परंतु केंद्र सरकारने अद्याप कोणतीही पाऊले उचलली नाहीत. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मी नेहमीच कटिबध्द राहिलो असून विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देणार असा शब्द विचारे यांनी स्थानिकांना दिला.