‘ग्रे हेडेड लॅपविंग’चे प्रथमच दर्शन; स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी

जिल्ह्य़ातील स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान असलेल्या ठाणे खाडीत यंदा ग्रे हेडेड लॅपविंग (राखाडी डोक्याची टिटवी) हा पक्षी पहिल्यांदाच आढळून आला आहे. पक्षी अभ्यासकांच्या मते, महाराष्ट्रात अमरावती, ताडोबा, नाशिक, गोंदिया, मुंबई या ठिकाणीच आतापर्यंत या पक्ष्याने हजेरी लावली होती. मूळचा चीन आणि जपानचा असणारा हा पक्षी २०१३ मध्ये अमरावती आणि जळगाव येथे दिसला होता. त्यानंतर आता पाच वर्षांनी ठाणे खाडी परिसरात ‘ग्रे हेडेड लॅपविंग’ दाखल झाल्याने गेल्या आठवडाभरापासून या पक्ष्याला पाहण्यासाठी पक्षीप्रेमी ठाणे खाडी परिसरात गर्दी करत आहेत.

पक्षी निरीक्षणासाठी ठाणे खाडी परिसर महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत खाडी परिसरात स्थानिक पक्ष्यांबरोबरच स्थलांतरित पक्ष्यांना न्याहाळण्याची संधी पक्षी प्रेमी, छायाचित्रकारांना मिळत असते. यंदा ठाणे खाडी परिसरात ग्रे हेडेड लॅपविंग हा पक्षी ओंकार अधिकारी या पक्षी अभ्यासकाच्या निर्दशनास आला. या पक्ष्याने ठाणे खाडीत पहिल्यांदाच हजेरी लावल्याने पक्षी अभ्यासकांसाठी या पक्ष्याचे आगमन विशेष लक्षवेधी ठरले आहे. जपान आणि चीन या देशात वास्तव्यास असणारा हा पक्षी भारतात बंगाल, उडिसा, भरतपूर, केरळ, बिहार, कर्नाटक राज्यात आढळतो. २०१३ मध्ये अमरावती आणि जळगाव या ठिकाणी हा पक्षी आढळला होता, अशी माहिती ‘बर्ड ऑफ ठाणे रायगड डिस्ट्रिक्ट’ संस्थेचे सदस्य हिमांशु टेंभेकर यांनी दिली. यापूर्वी २०१० मध्ये कल्याण येथे तसेच २०११ आणि २०१२ साली डोंबिवली परिसरात हा पक्षी आढळल्याची नोंद काही पक्षी अभ्यासकांनी केली असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

प्रवासाचा मार्ग

जपान आणि चीन येथे वास्तव्यास असणारा हा पक्षी ईशान्य भारताकडून प्रवास करीत महाराष्ट्रात येत असतो. हिमालय पर्वत परिसरातून नेपाळ, अरुणाचल प्रदेश किंवा उत्तर प्रदेश या ठिकाणाहून हा पक्षी भारतात दाखल होतो. भारतात आल्यावर छत्तीसगढ, मध्य प्रदेश या ठिकाणाहून हा पक्षी मुंबईमध्ये दाखल होतो. उत्तर महाराष्ट्रात हा पक्षी जास्त प्रमाणात आढळतो, अशी माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.

गेल्या वर्षी कॉमन शेल्ड डक हा पक्षी ठाणे खाडीकिनारी दिसला होता. सर्वसाधारणपणे हा पक्षी उरण परिसरात पाहायला मिळतो. मात्र गेल्या वर्षी ठाणे खाडी परिसरात तीन कॉमन शेल्ड डक पक्षी पाहायला मिळाले होते. तसेच एशियन डोविचर हा उत्तर अमेरिका खंडातून स्थलांतरित होणारा पक्षी खाडी परिसरात दिसला होता. यंदा हे पक्षी दिसले नाहीत.

– हिमांशू टेंभेकर, पक्षी अभ्यासक

ग्रे हेडेड लॅपविंग हा पक्षी भारताच्या बंगाल, बिहार या ठिकाणी अधिक प्रमाणात आढळतो. पश्चिमेकडील भागात या पक्ष्याचे वास्तव्य अतिशय तुरळक प्रमाणात असते. ठाणे खाडी पश्चिम भागात येते. त्यामुळे ठाणे खाडीत या पक्ष्याने दिलेली भेट निश्चितच पक्षी प्रेमी, अभ्यासकांसाठी पर्वणी आहे.

डॉ. असद रेहमानी, निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार (बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटी)