Premium

मुंबईचा राडारोडा पुन्हा ठाण्यात, ठाण्याच्या खाडी भागात टाकला जातोय राडारोडा

हवा प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबईतून ठाणे शहरात होणारी राडारोड्याची वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने पथके तैनात केली आहेत.

road debris of Mumbai is again being put in Thane Bay area
पाणथळ समितीच्या बैठकीत सदस्यांनी व्यक्त केली नाराजी व्यक्त केली (फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : हवा प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबईतून ठाणे शहरात होणारी राडारोड्याची वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने पथके तैनात केली आहेत. परंतु या पथकाची कारवाई थंडावल्याने मुंबईतून ठाण्यात पुन्हा राडारोड्याची वाहतूक सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतून डम्परद्वारे हा येणारा राडारोडा ठाणे खाडीकिनारी भागात टाकला जात असून यामुळे कांदळवन क्षेत्र नष्ट होण्याबरोबरच येथील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. याच मुद्द्यावरून पाणथळ समितीच्या बैठकीत सदस्यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत याकडे लक्ष देण्याची सुचना केली.

मुंबईतील हवेचा दर्जा नोव्हेंबर महिन्यात खालावला होता. मुंबई शेजारील ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्येही अशीच काहीशी स्थिती होती. या हवा प्रदुषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. तसेच हवा प्रदुषण रोखण्यासाठी न्यायालयाने पालिकांना मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. यानंतर मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने प्रभाग समितीनिहाय पथके तयार केली होती. रस्त्याकडेला राडारोडा टाकणाऱ्यांवर तसेच मुंबईतून ठाणे शहरात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पथकांवर देण्यात आली होती. मुंबई-ठाण्याच्या वेशीवर दिवसा आणि रात्री अशी दोन पथके तैनात करण्यात आली होती. या एका पथकामध्ये सहाजणांचा समावेश होता. या पथकाकडून मुंबईतून ठाण्यात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या डम्परचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती. परंतु ही कारवाई काहीशी थंडावल्याने मुंबईतून ठाणे शहरात राडारोड्याची वाहतूक सुरू झाली आहे.

आणखी वाचा-मुंब्रा बायपास मार्गावर वसूली ? राष्ट्रवादीचे नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून समाजमाध्यमावर चित्रफित प्रसारित

मुंबईतून डम्परद्वारे हा येणारा राडारोडा ठाणे खाडीकिनारी भागात टाकला जात असल्याची तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मुंब्रा, दिवा भागात खाडी किनारी परिसरात मोठ्याप्रमाणात राडारोडा आणि मातीचे ढिगारे आहेत. मुंब्रा येथील चुहा पूल भागात मोठ्याप्रमाणात राडारोडा पडलेला आहे. तसेच सिमेंटच्या गोणी, बांधकामाचे साहित्य येथे आढळून येत आहे. विशेष म्हणजे, या भागात काही अंतरावर पोलीस ठाणे, कांदळवन कक्ष विभागाची चौकी आणि ठाणे महापालिकेचे कार्यालय आहे. तरीही येथे राडारोडा टाकून भराव टाकण्याचे प्रकार सुरू असून त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मुंब्रा रेतीबंदर येथेही राडारोड्याचे ढिगारे दिसून येत आहेत. दिवा खर्डी रोड भागातील तलावाजवळ अशाचप्रकारे मातीचा भराव करण्यात आला आहे. पहाटेच्या वेळेत येथे कचरा जाळण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. भरावामुळे ठाणे खाडी परिसरातील कांदळवन क्षेत्र नष्ट होण्याबरोबरच येथील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. या संदर्भात पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान आणि कांदळवन कक्षाचे विक्रांत खाडे यांच्याशी वारंवार संपर्क साधून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

राष्ट्रवादीचे नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमावर मुंब्रा येथील खाडी किनारी भरावाचे चित्रीकरण प्रसारित करत त्यांनी पालिकेच्या कारभारावर टिका केली आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासन झोपले आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असा आरोप त्यांनी केला आहे. हे अनधिकृत भराव टाकणाऱ्या गाड्या थांबवा अन्यथा त्या गाड्या पेटवू असा इशारा त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील कारागृहातून दोन महिन्यांत २६२ कैद्यांची सुटका, बंदी पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनंतर सुटका

मुंबईतून डम्परद्वारे हा येणारा राडारोडा ठाणे खाडीकिनारी भागात टाकला जात असून यामुळे कांदळवन क्षेत्र नष्ट होण्याबरोबरच येथील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. याच मुद्द्यावरून पाणथळ समितीच्या बैठकीत सदस्यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत याकडे लक्ष देण्याची सुचना केली. या वृत्तास पाणथळ समितीचे सदस्य रोहित जोशी यांनी दुजोरा दिला आहे. मुंबईतील राडारोडा रस्ते मार्गे ठाण्यात आणला जात असून त्याद्वारे खाडी किनारी भराव केला जात आहे. हा मुद्दा नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत उपस्थित झाला असून याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेने २४ तास पथके नेमल्यास हा प्रश्न सुटेल, अशा सुचनाही सदस्यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या पालिका अधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Road debris of mumbai is again being put in thane bay area mrj

First published on: 07-12-2023 at 10:32 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा