कल्याण – मुंबईच्या विविध भागातून, कुर्ला परिसरातून काही वर्षापूर्वी हटविलेले बहुतांशी बडे भंगार विक्रेते डोंबिवली, शिळफाटा, दहिसर-मोरी परिसरात येऊन स्थिरावले आहेत. २७ गाव हद्दीतील गोळवली, सोनारपाडा, पिसवली, व्दारली, उंबार्ली हा भंगार गोदामांचा पट्टा म्हणून ओळखला जातो.

या भंगारा गोदामांमुळे यापूर्वी या भागात आगीच्या घटना घडल्या आहेत. डोंबिवली एमआयडीसी परिसरात स्थानिकांच्या मदतीने वन, सरकारी, पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर ही बेकायदा गोदामे सुरू करण्यात आली आहेत. डोंबिवली परिसरात भंगार संकलकांंकडून जमा होणारे भंगार या बड्या भंगार विक्रेत्यांना विकले जाते. याशिवाय जुन्या कंपन्या, इमारतींमधील भंगार हे विक्रेते विकत घेतात. एमआयडीसी परिसरात तांब्याच्या तारा, लोखंड आणि उत्पादन प्रक्रियेशी महत्वाच्या सामानांची चोरट्यांनी चोरी केली की ते चोरीचे साहित्य भंगार विक्रेते कमी किमतीला विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावतात.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील जळीत अमुदान कंपनीच्या मालक, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

या भंगार विक्रेत्यांना स्थानिक पोलीस, शासकीय, कल्याण डोंबिवली पालिका यंत्रणा यांचा पाठिंबा आहे. दर महिन्याला स्थानिक पोलिसांची या भागात एक फेरा असतो. मानपाडा पोलीस ठाण्यात या भंगार गोदामांमुळे वरिष्ठ अधिकाऱ्याचे पद मिळवण्यासाठी मोठी चढाओढ लागते, अशी पोलीस दलात चर्चा आहे.

आपल्या हद्दीत बेकायदा भंगार विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकारी स्थानिक कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकाऱी यांना आहेत. या यंत्रणा काही दुर्घटना घडल्याशिवाय कधीच भंगार विक्रेत्यांवर कारवाई करत नाहीत. गेल्या दोन महिन्यापूर्वी गोळवली भागात दुपारच्या वेळेत भंगार गोदामांना भीषण आग लागून परिसरातील दुकाने बेचिराख झाली होती.

२७ गाव भागातील बेकायदा भंगार विक्रीची दुकाने ही कल्याण डोंबिवली शहरांना लागलेली किड आहे. ७ डिसेंबर २०१३ रोजी शिळफाटा रस्त्यावरील गोळवली भागातील गायकर कम्पाऊंडमध्ये एका भंंगार दुकाना बाहेरील बॉयलरची तोडफोड करताना भीषण स्फोट होऊन तीन कामगार ठार आणि लगतची घरे आगीने प्रभावीत झाली होती. ९ डिसेंबर २०२० रोजी सोनारपाडा येथील एका भंगार गोदामाला आग लागून ४० गाळे खाक झाले होते.

हेही वाचा >>> अंगठीवरून समजली अमुदान कंपनी स्फोटातील महिला कर्मचाऱ्याच्या मृतदेहाची ओळख

शिळफाटा रस्त्यावरील दहिसर-मोरी परिसरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर भंंगार विक्रीची भव्य दुकाने उभी आहेत. तरीही महामार्ग प्राधिकरण या दुकानांवर कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व बेकायदा भंगार दुकानांना महावितरणची चोरून वीज वापरल्याच्या तक्रारी आहेत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी आता प्रभावीणपणे सक्रिय होऊन २७ गाव परिसरातील बेकायदा भंगार गोदामांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांंकडून केली जात आहे.

कल्याण, डोंबिवलीसह २७ गाव हद्दीत सरकारी, वन जमिनींवर सर्व बडे भंगार विक्रेते हे मुंबईतून हटविल्यानंतर या भागात आले आहेत. चोऱ्यांतून मिळणारे सामान घेऊन त्यांची विक्री करणे हे यांचे उद्योग आहेत. एमआयडीसीतील चोऱ्यांमधील सामान हेच विक्रेते खरेदी करतात. यांना स्थानिक यंत्रणेचा पाठिंबा असल्याने ते येथे उद्योग करतात. या विक्रेत्यांमुळे काही दुर्घटना घडली तर स्थानिकांचे जीव धोक्यात आहेत आणि प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा पण प्रश्न निर्माण होऊ शकतो. स्थानिक पालिका, पोलिसांचे या विक्रेत्यांशी संगनमत आहे. त्यामुळे शासनाने हे भंगार विक्रेते हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा.  -संदेश प्रभुदेसाई- व्यावसायिक.