डोंबिवली: एमआयडीसीतील सोनारपाडा भागातील स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत तीन महिन्यापूर्वी लेखा विभागात कामाला लागलेल्या एका ३८ वर्षाच्या महिलेच्या मृतदेहाची ओळख तिच्या अंगठीवरून पटविण्यात आली. स्फोटामध्ये या महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न, काळाठिक्कर झाला होता. ओळख न पटविण्या पलिकडे असलेला या मृतदेहाच्या हाताच्या बोटात अंगठी होती, या अंगठीवरून या मयत महिलेच्या पतीने आपल्या पत्नीची ओळख पटवली.

रिध्दी अमित खानविलकर (३८) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या तीन महिन्यांपूर्वी अमुदान केमिकल कंपनीत लेखा विभागात नोकरीला लागल्या होत्या. रिध्दी या पती अमित, १२ वर्षाच्या मुलासह मानपाडा भागात राहतात. अमित हे पालघर येथील एका प्रयोगशाळेत काम करतात. गुरुवारी बुध्द पौर्णिमा असल्याने अमित खानविलकर घरीच होते. पत्नी रिध्दी कामाला गेली होती.

हेही वाचा : स्ट्राँग रुम भागात पुन्हा ठेकेदाराकडून खोदकाम, विद्युत वाहिनी तोडल्याने महावितरणकडून ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

दुपारी दोन वाजताच्या दरम्यान एमआयडीसीत भीषण स्फोट झाला. त्यानंतर अमित यांनी तात्काळ पत्नी रिध्दीला मोबाईलवर संपर्क केला, पण तिचा संपर्क झाला नाही. त्यानंतर रिध्दी काम करत असलेल्या अमुदान कंपनीत स्फोट झाल्याचे अमित यांना समजताच ते त्या दिशेने मित्रांसह गेले. ते भेदरलेले होते. सतत संपर्क करूनही पत्नीच्या मोबाईलवरून प्रतिसाद मिळत नव्हता.

अमित आणि त्यांचा मित्र अमित म्हाब्दी यांना अमुदान कंपनीतील गंभीर जखमींना पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे सांगण्यात आले. दोघेही शास्त्रीनगर रग्णालयात गेले. पोलिसांच्या माध्यमातून अमित यांनी गंभीर रुग्ण कामगार पाहिले. ते काळेठिक्कर न ओळखण्या पलिकडे होते. ाआपली पत्नी आहे कोठे आहे, या विचारात असताना अमित यांची नजर एका मृतदेहाच्या हाताच्या बोटांकडे गेली. त्या बोटात अंगठी होती. पत्नी रिध्दी खानविलकर अशाच पध्दतीची अंगठी घालत होती. तिचाच हा मृतदेह असल्याचे अमित यांना समजल्यावर ते कोलमडले. सुट्टीनिमित्त मामाकडे गेलेल्या मुलाला आता काय सांंगायचे या विचाराने ते शोकाकूल झाले.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात आरटीईसाठी ११ हजार अर्ज दाखल, अर्ज भरण्याची ३१ मे अंतिम तारीख

अंगठी नसती तर अमित पत्नीला मृतदेह ओळखू शकले नसते. त्यामुळे संबंधित मृतदेह रिध्दी खानविलकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. अमुदान कंपनी लगतच्या सप्तवर्ण कलरंट्स कंपनीत काम करणारा राकेश राजपूत हाही स्फोटानंतर बेपत्ता होता. तो मोबाईलला प्रतिसाद देत नव्हता. आठ तासानंतर ही त्याचा शोध लागला नव्हता. राजपूत कुटुंंब हे सोनारपाडा गावात राहते. ते मुळचे उत्तराखंड राज्यातील आहेत. मागील १२ वर्षापासून राकेश राजपूत सप्तवर्ण कंपनीत नोकरी करत होता. या स्फोटात अमुदान कंपनीत नोकरी करणारी रोहिणी कदम (२३) ही मरण पावली आहे. ती कुटुंबीयांसह आजदे गावात राहत होती. ती रिध्दी खानविलकरची सहकारी होती.