भाजपला शह देण्यासाठी सेनेची खेळी
कल्याण, डोंबिवली शहरी भागातील नागरिक महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या कारभारावर नाराज असल्याने त्याचा फटका पालिका निवडणुकीत बसण्याची भीती शिवसेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे सेनेचे वर्चस्व असलेल्या २७ गावांमधून नगरसेवक निवडून आणून त्या बळावर महापालिकेत भाजपचा टेकू घ्यायचा नाही आणि सत्ता स्थापन करायची, अशा हालचाली शिवसेनेच्या गोटात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संघर्ष समितीच्या विरोधाला बगल देत या गावांमध्ये उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बंडखोरांना गळाला लावण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
डोंबिवलीलगत असलेली २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाली पाहिजेत असा शिवसेनेचा पहिल्यापासून आग्रह आहे. या गावांमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. सुमारे १८ ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात होत्या. हा भाग महापालिकेला जोडला तर भाजपला जवळ न करता पालिकेत शिवसेनेला एक हाती सत्ता राबविणे शक्य होईल, अशी सेना नेत्यांची गणिते आहेत.
या गावांमधील ठरावीक गटाकडूनच बहिष्काराची भाषा बोलली जात असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. पालकमंत्री एकनाथ िशदे यांचा आग्रह शिरसावंद्य मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर भाजप नेत्यांनी हट्ट धरल्याने ही गावे पुन्हा वगळून नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप नेत्यांनी शिवसेनेचे ग्रामीण भागातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी संघर्ष समितीला हाताशी धरून या भागात भाजपचा वरचष्मा राखण्याची व्यूहरचना आखली आहे. २७ गावांमधील नगरसेवकांचा बळावर सेनेचा महापौर झाला तरी, तो अल्पावधीत खाली खेचायचा अशीही तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचे समजते.