ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात येत असतानाच, मंगळवारी भाजपच्या इच्छुक उमदेवाराने अर्ज घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे ठाण्याच्या जागेचा सस्पेन्स आणखी वाढला असून ही जागा शिंदेच्या सेनेला मिळणार की भाजपला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नसून या जागेवर उमेदवार कोण असेल आणि कोणत्या पक्षाचा असेल याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना-भाजप युतीमध्ये ठाण्याची जागा शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे. परंतु शिवसेनेतील उठावानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यातूनच या जागेवर भाजपकडून सातत्याने दावा करण्यात येत आहे. असे असले तरी हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात येतो. त्यामुळे या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी ९ अर्ज मंगळवारी घेतले आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडी २,  आझाद समाज पार्टी १, भारतीय जनता पार्टी १, अपक्ष ४ आणि रिपब्लिकन सेना १ यांचा समावेश आहे. ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असतानाच मंगळवारी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे शिंदेच्या सेनेत अवस्थता पसरली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाची जागा महायुतीमध्ये कुणाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता वाढली आहे.