ठाणे : गेल्या काही वर्षांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सोमवारी श्रमजीवी संघटनेने दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींवर मोर्चा काढले. ठाणे जिल्ह्यात २१ तर पालघर जिल्ह्यात १८ ग्रामपंचायतींवर हे मोर्चे काढण्यात आले. मोर्चात रिकामे हंडे घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

राज्य सरकारच्या ४ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणाऱ्या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत, झापात नळाने पाणी पुरवठा मिळाला पाहिजे अशी जलजीवन मिशन योजना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाची तरतूद केली आहे. प्रत्येक गावात २ कोटी रुपयांपासून १० कोटी पर्यंतचा निधी आलेला आहे. मात्र या योजना पूर्णत्वास नाहीत. मूळ ठेकेदार फक्त कागदावर असून प्रत्यक्ष भलतेच ठेकेदार हे काम करत आहेत. अत्यंत निर्कृष्ट दर्जाने हे काम सुरू आहे असा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.

हेही वाचा – कल्याणच्या उमेवारीवरून ठाकरे गटात सावळागोंधळ, ट्विटरवरून स्वतःच केली उमेदवारी जाहीर, नंतर ट्विट डिलीट

हेही वाचा – “बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने सोमवारपासून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात २१ तर पालघर जिल्ह्यात १८ ग्रामपंचायतींवर धडक मोर्चे काढण्यात आले.