अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमदार बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाने भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या विरोधात निवडणूक लढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. बच्‍चू कडू आणि आमचा थेट संबंध नाही. त्‍यांची युती ही मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत आहे. त्‍यामुळे एकनाथ शिंदे हा तिढा सोडवतील किंवा मतदार ठरवतील ते होईल, असे स्‍पष्‍टीकरण भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील हॉटेल प्राईम पार्कच्‍या सभागृहात भाजपची संवाद बैठक आज सायंकाळी पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती एकसंघ असल्‍याचा दावा केला. ते म्‍हणाले, बच्‍चू कडू यांचा वेगळा पक्ष आहे. त्‍यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत युती आहे. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री स्‍वत: अमरावतीत निर्माण झालेला तिढा सोडवतील. पण, तरीही बच्‍चू कडू यांची नाराजी दूर झाली नाही, तर मतदार जे ठरवतील ते होईल. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा योग्‍य तो सन्‍मान राखण्‍याचा केंद्रीय आणि राज्‍य नेतृत्‍वाचा प्रयत्‍न आहे. त्‍यांचीही नाराजी दूर केली जाईल, असे बावनकुळे म्‍हणाले.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

अमरावतीत भाजपच्‍या उमेदवाराला निवडून आणण्‍याचा निर्धार महायुतीच्‍या सर्व घटक पक्षांनी केला आहे. नवीन उमेदवारामुळे नाराजी असते. एका वेळी एकाच व्‍यक्‍तीला उमेदवारी मिळत असते. पण, भाजपचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नाराज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विकसित भारताचा संकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी सर्व कार्यकर्ते नवनीत राणा यांचा प्रचार करीत आहेत. एकदा पक्षाचा निर्णय झाला की कार्यकर्ते हे समर्पित भावनेतून काम करतात, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

हेही वाचा – बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल

‘आमच्यात मतभेद नाहीत’

राज्‍यातील महायुतीचे सर्व उमेदवार लवकरात लवकर जाहीर होतील. आमच्‍यात कुठलेही मतभेद नाहीत. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्‍या नेतृत्‍वात महाराष्‍ट्रात आम्‍ही ५१ टक्‍के मते मिळवून ४५ हून अधिक जागा जिंकू, असा आम्‍हाला विश्‍वास असल्‍याचे बावनकुळे म्‍हणाले.

हेही वाचा – इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”

राणांच्या जात प्रमाणपत्रप्रकरणी निकाल लागल्याचा दावा केलाच नाही

नवनीत राणा यांच्‍या जात प्रमाणपत्रप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निकाल लागला आहे, असा दावा आपण कधीही केला नाही. आपल्‍या विधानाचा विपर्यास करण्‍यात आला. त्‍याला आपला नाईलाज आहे. आतापर्यंत या प्रकरणात जो काही निकाल लागला, तो जनतेसमोर आहे. सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल अजून यायचा आहे, असेच आपण बोललो होतो. त्‍यांचे जात प्रमाणपत्र वैध आहे, असे स्‍पष्‍टीकरण बावनकुळे यांनी दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu has no direct connection with bjp cm will take decision about them says chandrasekhar bawankule mma 73 ssb
First published on: 01-04-2024 at 19:27 IST