सप्टेंबर महिन्यातील १९ तारीख होती. पावसाळ्यामुळे वातावरण ढगाळ आणि उदासवाणे होते. अशातच उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्याचा दूरध्वनी खणखणला. ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक एस. बी. खामकर यांनी दुसऱ्याच रिंगला तो उचलला. उल्हासनगर-तीन येथील प्रबुद्ध नगरातील जीवन भय्याची चाळ येथे एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याची ती बातमी होती. ही माहिती मिळताच उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांसह जीवन भय्याची चाळ गाठली. तिथे मृतावस्थेत पडलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. असगर हुसेन अब्दुल मनन खान (२२) हे या मृत तरुणाचे नाव पोलिसांना समजले. ही चाळ तशी गजबजलेली असल्याने तेथे हत्येसारखी घटना झाल्याने पोलीसही चक्रावून गेले. प्राथमिक चौकशीत ही हत्या कुणी व का केली, याचा काहीच सुगावा लागत नव्हता.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त विकास तोटावार यांच्या आदेशाने उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय सायगांवकर यांच्या साथीने साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेटय़े व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक या प्रकरणाचा तपास करू लागले. असगरचा मोठा भाऊ घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली. असगर हा एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता, असे त्याच्याकडून समजले. तो राहात असलेल्या चाळीतील बहुतांश रहिवासी कामगारवर्गातील होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता काही कामगारांनी तसेच असगरच्या भावाने तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती दिली. त्याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी असगर कामाला असलेले गॅरेज गाठले. राजकुमार झा आणि अर्शद पठाण हे दोघेजण भागीदारीमध्ये हे गॅरेज चालवायचे. या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता हत्येच्या दिवशी आपण त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, असे राजकुमार याने सांगितले. मात्र, असगर काम करत असलेल्या गॅरेजच्या आजूबाजूला असलेल्या गॅरेजमधील कामगारांनीही राजकुमार झा आणि असगर हुसेनचे पटत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. परंतु, राजकुमारकडे त्र्यंबकेश्वरला गेल्याचे सबळ पुरावे होते. त्यामुळे पोलिसांचा तपास एका जागी अडून बसला.
राजकुमार झा हा संशयित होता. मात्र, त्याच्याविरोधात पुरावे नसल्याने पोलिसांचे हात बांधले गेले होते. मात्र, त्यांनी वेगवेगळ्या मार्गानी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान राजकुमार हा हत्येच्या आदल्या दिवशी असगरच्या घरी गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याला पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनेच ही माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच राजकुमार वठणीवर आला आणि त्याने आपणच असगरची हत्या केली, अशी कबूली दिली.
गॅरेज मालक झा व भागीदार अर्शद पठाण यांच्या गॅरेजमध्ये असगर हुसेन केवळ नोकरीच करत नव्हता तर त्याची काही भागीदारीही गॅरेजमध्ये होती. तसेच, त्याच्या चांगल्या कामाची प्रसिद्धी या भागीदार जोडगोळीला खपत असे. यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. या वादांबद्दल आजूबाजूला अनेक ठिकाणी कळले होते. हेच वाद अखेर असगर हुसेनच्या मृत्यूचे कारण बनले. हत्येच्या आदल्या रात्री असगर हुसेन घरी एकटा असल्याची माहिती घेत त्याच्या घरी जाऊन झा याने धारधार चाकू त्याच्या गळ्यावरून फिरवत निर्घृण हत्या केली व दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळीच त्र्यंबेकेश्वर गाठले. या घटनेत साथ असलेल्या अर्शद पठाण यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दोघांवर खटला सुरू आहे.