ठाणे : कळवा येथील विटावा भागात हाईट बॅरियर तुटल्याने गुरुवारी ठाणे बेलापूर मार्गावरील विटावा ते साकेत मार्गापर्यंत मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत. वाहतुक पोलीस आणि महापालिकेच्या पथकांनी हा हाईट बॅरियर रस्त्यामधून बाजूला केला आहे. परंतु वाहनांच्या रांगा लागल्याने ही कोंडी अद्याप फुटलेली नाही. तापमान वाढत असताना उन्हाचा फटका आणि कोंडी अशा दोन्ही संकटात चालक हैराण झाले आहेत.

हेही वाचा… ठाण्यात बेकायदा बांधकामांवर हातोडा

हेही वाचा… भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…

विटावा येथील रेल्वेपूलाजवळ जड-अवजड वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथे हाईट बॅरियर उभारण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका ट्रकने हाईट बॅरियरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, संपूर्ण हाईट बॅरियर तुटला. ठाणे – बेलापूर मार्गावरून सकाळी नवी मुंबई, ऐरोली मार्गे मुंबईच्या दिशेने हजारो वाहने वाहतुक करतात. परंतु हाईट बॅरियर टुटल्याने वाहतुक विस्कळीत झाली. विटावा ते साकेत रोड, कोर्टनाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कळवा येथील पूलावर वाहने एकाच ठिकाणी उभी आहेत. महापालिका आणि वाहतुक पोलिसांनी बॅरियर बाजूला केले आहेत. परंतु वाहनांचा भार वाढल्याने सकाळी १०.३० नंतरही कोंडी कायम आहे.