ठाणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील बेकायदा बांधकामांची पाहाणी करत त्याठिकाणी हातोडा मारण्याची कारवाई सुरू केली आहे. घोडबंदर, दिवा, कळवा आणि मुंब्रा परिसरातील बेकायदा इमारतींचे बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. निवडणुक काळात होत असलेल्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी प्राप्त होण्याबरोबरच या मुद्द्यावरून टिका होऊ लागल्यामुळे पालिका प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याची पालिकेत चर्चा असून ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिल्याने भुमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी हाती घेतली होती. यामध्ये अनेक बेकायदा इमारतींची बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. यामध्ये काही इमारतींवर कारवाई करण्यात येत नसल्याच्या तक्रारी पुढे होत्या. तसेच गेल्या काही दिवसांपासून पालिकेची कारवाईही थंडावली होती. या मुद्द्यावरून पालिकेवर टिका होत होती. त्यातच पालिकेची यंत्रणा निवडणुक काळात व्यस्त झाल्याने काही ठिकाणी बेकायदा इमारती उभारणीची कामे पुन्हा सुरू झाली होती. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनावर टिका केली होती. त्याचबरोबर शहरात होत असलेल्या बेकायदा बांधकामाच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त होऊ लागल्या होत्या. यामुळे आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त करत बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी जीपीएस सेटेलाईट प्रणालीचा वापर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीकोनातून बेकायदा बांधकामे हटवण्याची मोहीम १५ एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील बेकायदा बांधकामांची पाहाणी करत त्याठिकाणी हातोडा मारण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत कळवा, मुंब्रा, दिवा यासह घोडबंदर भागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा… भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…

हेही वाचा… ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन

कळव्यातील बुधाजी नगरमधील इमारतीच्या एका मजल्याचे बांधकाम, मुंब्रा येथील संजय नगरमधील पाच माळ्यांच्या इमारतीचा ३, ४ आणि ५ मजल्याचे बांधकाम, दिवा श्लोक नगर येथील दोन इमारतीच्या पायाचे बांधकाम आणि फडकेपाडा येथील गोदामाचे बांधकामावर हातोडा मारण्यात आला. तसेच घोडबंदर येथील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग यांच्या तळ अधिक २ मजली इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली. शहरात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.