कल्याण : मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसात गुरुवारी संध्याकाळी कल्याण, डोंबिवली शहरात अनेक मोठी झाडे वीज वाहिन्यांवर कोसळली आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

अनेक ठिकाणचे रस्ते झाडे कोसळल्याने बंद झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात डोंबिवलीत मोठागाव, देवीचापाडा, नवापाडा, सरोवर नगर, गावमंदिर भागात झाडे वीज वाहिन्यांवर कोसळली आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब, वीज वाहक तारा झाडाच्या भारांनी वाकले आहेत.

हेही वाचा…भाजपमधील निष्ठावान डावलून गद्दारांना उमेदवारी, संघाला भाजपची वाटचाल मंजूर आहे का; उध्दव ठाकरे यांचा सवाल

अग्निशमन दलाची पथके रस्त्यावर पडलेली झाडे बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्याची कामे करत आहेत. महाराष्ट्रनगरमध्ये इमारतीवरील सौर उर्जा पट्ट्या वादळी वाऱ्याने रस्त्यावर पडल्या आहेत. या वर्दळीच्या रस्त्यावर कोणी नसल्याने जीवित हानी टळली. वड, शोभेची झाडे, गुलमोहर या झाडांचा कोसळण्यामध्ये समावेश आहे. झाडे कोसळल्याने वाहन चालकांना वाहने वळसा घेऊन इच्छित ठिकाणी न्यावी लागत आहेत. महावितरणची पथके वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.