ठाणे : वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा उडडाणपूलाजळ काँक्रिटीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केले आहे. या काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी मुख्य रस्त्यावरील काही भागात यंत्र ठेवण्यात आली असून यामुळे महामार्गावर कोंडी होऊ लागली आहे. या कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून यामुळे पुढील दोन महिने या मार्गासह त्याला जोडणाऱ्या ठाणे, भिवंडी, मुंब्रा मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरून हजारो वाहने नाशिक, मुंब्रा बाह्यवळण आणि भिवंडीच्या दिशेने वाहतुक करत असतात. भिवंडी, पडघा, नाशिक भागातील गोदामांमुळे या मार्गावर अवजड वाहनांचा मोठा भार असतो. असे असले तरी हा मार्ग वाहनांच्या तुलनेत अरुंद आहे. या मार्गाला समृद्धी महामार्ग जोडला जाणार असून त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित होता. परंतु त्यांच्याकडून या मार्गाची देखभाल दुरूस्ती होत नसल्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडतात. त्याचा परिणाम वाहतूकीवर होऊन येथे वाहनांच्या रांगा लागतात.

हेही वाचा >>>शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे धरणे आंदोलन

भविष्यातील समृद्धी महामार्गावरील वाहनांचा भार या मार्गावर वाढणार आहे. यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त करण्याबरोबरच त्याच्या रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने २०२१ मध्ये हाती घेतले आहे. ठाण्यातील माजिवाडा ते पडघा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असून त्यातील अंतिम टप्प्यातील काम माजिवडा उड्डाणपुल ते साकेत पूलदरम्यान सुरू आहे. येथे रुंदीकरणाबरोबरच रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी वाहतूक सुरू असलेल्या काही मार्गिकांवर यंत्रणा ठेवावी लागत असून यामुळे साकेत ते माजिवडा पर्यंत कोंडी होऊ लागली आहे. पुढील दोन महिने हे काम सुरू राहणार असून तोपर्यंत ही कोंडी कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काँक्रिटीकरणाचे काम पू्र्ण झाल्यानंतर या मार्गिकेवरून वाहतुक सुरु केली जाणार आहे. या कामानंतर दोन पदरी असलेला मार्ग चार पदरी होणार आहे. यामुळे येथील कोंडीची समस्या कमी होण्याची शक्यता आहे, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी सांगितले.