आपल्याला नवीन भाषा शिकायला वेळ नाही म्हणता मग झोपपूर्वीही तुम्ही नवीन भाषा शिकू शकता असे वैज्ञानिकाचे मत आहे. झोपेपूर्वी इतर भाषा नुसत्या ऐकल्याने तुमचे त्या भाषेचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण होते. झुरीच व फिरबोर्ग येथील विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार जर्मन भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना झोपेत डच शब्दांचे अर्थ नव्याने समजून घेण्यास मदत झाली. झोपेत असताना त्यांनी हे शब्द ऐकले. जैवमानसशास्त्रज्ञ बिजोर्न राश यांनी सांगितले की, प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात हे शक्य होते पण रोजच्या जीवनात तसे शक्य आहे किंवा नाही याचा अभ्यास चालू आहे. थॉमस श्रेनर व राश यांनी डच व जर्मन शब्द शिकण्यासाठी स्वयंसेवकांना निवडले. त्यातील निम्म्या स्वयंसेवकांना नंतर झोपायला पाठवण्यात आले. झोपेपूर्वी त्यांना डच शब्द शिकवण्यात आले नंतर ते शांतपणे झोपी गेले. बाकीच्यांनाही प्लेबॅकवर डच शब्द ऐकवण्यात आले पण त्यांना जागे ठेवण्यात आले. झोपलेल्यांना रात्री दोन वाजता उठवून नवीन शब्द त्यांना विचारण्यात आले तर त्यांनी डच शब्दांचे जर्मन भाषांतर अचूक सांगितले. जे जागे राहिले त्यांना सांगता आले नाही. झोपेमुळे स्मृती वाढते कारण झोपेत मेंदू आधी शिकलेले पुन्हा आठवत असतो त्यामुळे आपल्याला शिकलेले आठवते. झोपेपूर्वी तुम्ही वाचलेले शब्द तुम्हाला नंतर आठवतात. झोपेत असताना रेकॉर्ड लावून ठेवली तर ते शब्द लक्षात राहात नाहीत. असे श्रेनर यांचे मत आहे.
बदामामुळे हृदयरोगाला आळा
रोज मूठभर बदाम सेवन केल्याने हृदयरोगाला आळा बसतो. कारण रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील अ‍ॅशटन विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, बदाम सेवन केल्यानंतर रक्तप्रवाहात अँटीऑक्सिडंट सोडले जातात व त्यामुळे रक्तदाब कमी होतो तसेच रक्तप्रवाह सुरळीत होतो. भूमध्यसागरी आहारात बदामाचा समावेश असल्याने त्याचा चांगला फायदा होतो व या सिद्धांतावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. बायोमेडिकल सायन्सेसचे प्रा. हेलेन ग्रिफीथ यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले आहे. संशोधकांनी बदामयुक्त आहाराचा तरूण व मध्यमवयीन पुरुषांवर होणार परिणाम तपासला असता ज्यांनी बदाम सेवन केले त्यांचा रक्तप्रवाह अल्फआ टोकोफेरॉलमुळे सुधारला तसेच रक्तदाबही कमी झाला. त्यांना महिनाभर रोज ५० ग्रॅम बदाम सेवन करण्यास देण्यात आले होते. बदामात इ जीवनसत्त्व, आरोग्यदायी मेद, तंतू व फ्लॅवनॉइड्स असतात त्यामुळे त्याला अँटी ऑक्सिडंट गुणधर्म प्राप्त होतात. या सर्व पोषकांमुळे बदाम सेवनाचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. बदाम हे खूप चांगले अन्न आहे, केवळ पन्नास ग्रॅम बदामांनी आरोग्यात चांगला फरक पडू शकतो असे ग्रिफीथ यांनी सांगितले.
अध्र्या तासात क्षयाचे निदान
क्षयाचे निदान अवघ्या तीस मिनिटात होऊ शकेल, अशी कमी खर्चाची चाचणी वैज्ञानिक विकसित करीत असून त्यात वापरण्याचे यंत्र कुठेही सहज नेता येऊ शकते. त्याला बॅटरीच्या आधारे वीजपुरवठा केला जाईल. क्षयाचे निदान करण्याची सर्वात कमी वेळाची ही चाचणी आहे. सध्या या चाचणीला जीनएक्सपर्ट म्हणतात. त्यामुळे क्षयाच्या मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलोसिसचा डीएनए अवघ्या दोन तासात शोधता येतो. त्यासाठी खास सामुग्री लागते. त्यामुळे विकसनशील देशातील ग्रामीण भागात त्याचा वापर करणे सोपे नाही. स्टॅनफोर्डचे रसायनशास्त्रज्ञ जियांगघांग राव व टेक्सास ए अँड एमचे जेफ्री सिरिलो यांनी ही चाचणी शोधली आहे, त्यात सीडीजी ३ हे रसायन वापरले जाते. त्याचे विभाजन एम टय़ुबरक्युलोसिसमधील  विकराने विभाजन केल्यानंतर हे रसायन चमकते. संशोधकांच्या मते एक मिलीलीटर नमुन्यात दहा जीवाणू असतात. टेक्सास येथे थुंकीच्या पन्नास नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ती अचूक ठरली. त्यात ८० टक्के नमुने असे होते की, ज्यात संसर्ग दिसत नव्हता. मुख्य कार्यकारी मायकेल नॉर्मन यांनी सांगितले की, २०१५ पर्यंत हे चाचणी उपकरण तयार होणार असून त्याची किंमत ५ डॉलर राहील व तीस मिनिटांत क्षयाचे निदान शक्य होईल.