|| अभिराम भडकमकर

‘‘ती माझ्या परिचयाचीच होती. माणूस म्हणून तिच्या या जगण्याबाबत माझी काही मतं होती, प्रश्न होते, आक्षेपही होते, पण लेखक म्हणून मला ते तिच्यावर लादायचे नव्हते. उलट तिच्या कक्षेत शिरून मला तिला अधिक जाणून घेत मांडायचं होतं. कारण परिचयाची ती बरीचशी अनोळखीही होती मला. म्हणून नाटकात येताना मी तिच्यावर हावी न होता मलाच तिच्या जगण्याच्या आवर्तात स्वत:ला मुरवून घ्यायचं होतं..’’ ‘याच दिवशी याच वेळी’ नाटकातल्या अनघाविषयी..

तशी ती माझ्या परिचयाचीच होती. माझ्याच आजूबाजूची. जुनी सनातनी चौकट केव्हाच मोडून पुढं एकविसाव्या शतकात आलेली. संपूर्ण कात टाकायला ती काही सर्पयोनीतली नव्हती. पण जुनी मळकट ओझी बऱ्यापकी टाकलेली आणि नव्या क्षितिजाकडे झेपावणारी. उंबरठय़ाच्या बाहेर येत ती आत्मविश्वासानं बाहेरच्या जगात वावरू लागलेली. पण तरीही चूल आणि मूल पूर्णत: मागे टाकून न दिलेली. आपल्या तनमनाची निश्चित जाग असलेली पण त्यासोबतच कुटुंब समाज यापासून न तुटलेली. जुन्या संस्कारांच्या काचातून थोडी बाहेर आलेली. तसं येताना काही संस्कार काळानुरूप टाकून दिलेली, काही आपोआप गळून पडलेली, काही गरसोयीचे म्हणून त्यागणारी तर काहींच्या छायेतून काही केल्या बाहेर न पडू शकलेली. म्हणूनच गळ्यात सोन्यासारखं भासणारं मंगळसूत्र, मॅचिंग टिकल्या, बांगडय़ांच्या सोबत घडय़ाळ, मोबाइलवरून जगभराशी जोडलेली.. वटपौर्णिमेला दिसते ती छानशा साडीत, गजरा वगरे घालून लेडीज डब्यासमोर उभी. आणि ग्लोबलाझेशननंतरच्या टारगेटनी जीव नकोसा झालेल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या संसाराची आर्थिक बाजूलाही हातभार लावणारी. तशी मुक्तीबिक्तीबद्दल फार न बोलणारी पण आपल्याच आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक परिसराशी कुठे भांडत, कुठे जुळवून घेत, कुठे तडजोडी करत, कुठे शरण जात तर कुठे विजय मिळवत पुढे पुढे जात राहिलेली.

निसर्गानं दिलेलं बाईपण, आईपण आपल्या परीनं स्वीकारलेली. कधी त्याचा कंटाळा आलेली, कधी त्याचे सोहळे करणारी. आणि या सगळ्यांतूनही जगाकडे जगण्याकडे शक्य तितक्या प्रसन्नतेनं पाहणारी. त्याच त्याच रूटीनच्या चक्रातून बाहेर पडू पाहत परत त्यातच अडकत सुख-समाधान शोधणारी किंवा आहे त्यालाच सुख-समाधान मानत जगणारी.. ती माझ्या परिचयाचीच होती. माणूस म्हणून तिच्या या जगण्याबाबत माझी काही मतं होती, प्रश्न होते आक्षेपही होते, पण लेखक म्हणून मला ते तिच्यावर लादायचे नव्हते. उलट तिच्या कक्षेत शिरून मला तिला अधिक जाणून घेत मांडायचं होतं. कारण परिचयाची ती बरीचशी अनोळखीही होती मला. म्हणून नाटकात येताना मी तिच्यावर हावी न होता मलाच तिच्या जगण्याच्या आवर्तात स्वत:ला मुरवून घ्यायचं होतं. तिच्या अंतरंगात डोकावताना तिला लोकल पकडायला उभं असताना, मॉलमध्ये खरेदी करताना किंवा कधी कुणा नातेवाईकाच्या लग्नात मेजवानीत थोडंसं नाचताना बघत होतो तसंच तितकंच तटस्थपणे पाहात हे करायचं होतं.

तशी कळायला साधी होती का ती? ‘सगळेच राजकीय पक्ष सारखेच, कुणाला द्यायचं मत?’ हे तिचं राजकारणाबद्दलचं आकलन. सकाळची लोकल पकडायची असते सगळ्यांचे डबे करून, म्हणून पूजेला फारसा वेळच नसला तरी दोन उदबत्त्या खोचून पटकन फुलं, रेडीमेड गंध लावून पूजा उरकून घेण्याइतकी धार्मिक. सध्या वेळ नसतो पण काही पुस्तकं, लेखक कवींचं पूर्वी काही वाचलेली. पण इतकी सुलभही नव्हती ती. तिच्या मनावर काही गोष्टी बिंबवल्या होत्या तिच्या गणोरकर बाईंनी. लहानपणी वर्गात एक मुलगी डबीत पावडर आणायची नि दर तासाला लावायची. हिनं विचारलं, ‘‘मी पण लावू का?’’ तर मराठीच्या गणोरकर बाई म्हणाल्या की, ‘‘पावडर लावायचीच तर स्वत:साठी लाव. दुसऱ्यांसाठी नको.’’ बाकी मुली हसल्या पण तिला का कोण जाणे नंतर फार पावडरी स्नोत मनानं गुंतता आलंच नाही.  त्याच बाईंनी ‘‘कुसुमाग्रजांची सूर्याच्या मागे गोंडा घोळत फिरणारी पृथ्वी मला आवडत नाही,’’ असं म्हटलं होतं तेव्हा बाकी मुलींना काय वाटलं माहीत नाही पण ही मात्र उगीचच अंतर्मुख झाली होती. इथे ती सुलभ राहात नाही. बिनधास्त मुक्तीचा झेंडा घेऊन उभं राहात किंवा आमच्यात हे असंच असतं म्हणून पदर बुरखा घेऊन वावरती तर सोपं गेलं असतं. अशा काही संख्येनं कमी नाहीत. आणि नाटकात तर जागोजागी अशाच आढळतात. वर्तमान-भूत-भविष्य असं काही नसतंच. मानवानं सोयीसाठी पाडलेले हे तुकडे आहेत असं म्हटलं गेलंय. पण एकाच वेळी अशा तीनही तुकडय़ांत वावरणारी ती मला म्हणूनच गुंतागुंतीचीही वाटते आणि म्हणूनच ती नाटकात आली तेव्हा या सगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या पदरांसह, वैशिष्टय़ांसह आणि तुकडय़ांसह..

अनघा! तिचं नाव झालं. का माहीत नाही. जसं ‘देहभान’ची वसुधा पृथ्वीसारखी, निर्मळ मनाची म्हणून ‘ज्याचा-त्याचा प्रश्न’मधली निर्मला किंवा अशिक्षित पण गुणी म्हणून सगुणा.. तसं हिचं काही नाही झालं. ती समोर वावरू लागली आणि वाटलं ही अनघा. तशी ती श्वेता, सारिका, चित्रा, तनुजा कुणीही होऊ शकली असती.

एकाच वेळी कुणीही वाटू शकणं आणि तिचं अनघा असणं मला महत्त्वाचं वाटू लागलं म्हणून जनरल होता होता ती खास होऊ लागली.

तसं तिचं बरंच चाललं होतं. चालत नव्हे धावत होतं. घराचे हफ्ते फिटायच्या बेतात होते. नवरा मल्टिनॅशनलमध्ये. मुलगा कॉन्व्हेंटमध्ये. टीव्हीपासून सगळं सुबत्तावालं घरात. नाइन टू फाइव्हच्या टिकटिकीनुसार सगळं छान धावत होतं. पण धावता धावता तिला मध्येच वेगळा ताल ऐकू येऊ लागला. तिची आजवर छान लयीत पडणारी पावलं चुकू लागली.. घसरतील की काय असंही वाटू लागलं. नाटक तिच्या कोनातून पाहिलं तर इथून सुरू होतं. जे चाललंय ते नेमकं काय आहे? तिला कुठल्या विचारधारेचा चष्मा नाही. कुठल्या तत्त्वज्ञानाचा अभिनिवेश नाही. आणि म्हणून तिला उत्तरं शोधायचीत ती तिच्या जगण्यातूनच. आणि तिला तिचं जगणंच समजेनासं झालंय.

पहिल्याच सीनमध्ये सकाळ आहे. नवरा ऑफिसला जायच्या तयारीत. मुलगा उठलाय नुकताच. हीसुद्धा आवरतेय. एक घर साडेसहा ते नऊ एकत्र आहे, पण मी जाणीवपूर्वक एक गोष्ट केली. तिघांचा एकदाही आय काँटॅक्ट नाही. बोलतात एकमेकांशी एकमेकांसंदर्भात पण लक्ष टीव्हीत किंवा इतर गॅझेटस्मध्ये. बाहेर पडणारा नवराही गालाला गाल लावून ‘लव्ह यू’ म्हणतो ते तिच्याकडे न पाहता आणि ती ही ‘लव्ह यू टू’ म्हणते ते त्याच्याकडे न पाहता. त्या तिघांच्या हे गावीही नाही पण यामुळेच आत काही खळबळ माजलीये का? एकदा घरी परतते तेव्हा मानस तिचा मुलगा संगणकावर गेम खेळतोय, मागे टीव्ही लागलेला त्याकडे पाठ. ही विचारते, ‘‘बंद का नाही केलास?’’ तर तो सहज म्हणतो, ‘‘घरी कुणी तरी असल्यासारखं वाटतं गं आवाजानं.’’ किंवा ती आणि नवरा संध्याकाळी एकत्र घरात. दोघं बोलताहेत बराच वेळ पण दोघांचे विषयच वेगळेत. तो ऑफिसच्या कटकटींबद्दल ही त्या टीव्हीतल्या छान सिनेमाबद्दल. पण दोघांना वाटतंय ते एकमेकांशी बोलताहेत.. असा सु(?)संवाद आहे घरात..

चालता चालता अनघा या सगळ्याकडे पाहू लागते, आपल्या आयुष्याकडे, जगण्याकडे पाहू लागते.. तिच्या या पाहण्याचा साक्षीदार मला व्हायचं होतं. नवऱ्याला जॉबची असुरक्षितता, मुलामध्ये या दोहोंच्याही नकळत पदा झालेली भावनिक असुरक्षितता, मत्रिणीच्या मनातली सौंदर्याच्या रूढ चौकटीतनं वयपरत्वे हद्दपार होण्याची असुरक्षितता या सगळ्यात अनघाच्या मनात एक वेगळ्याच असुरक्षेच्या भावनेनं घेरलंय. ते तिचं तिलाही न कळणं मला दिसत होतं. घरातला संवाद संवाद उरला नव्हता. टीव्हीवरच्या आशाताईंचा शो संवाद साधणारा, प्रश्नांना उत्तरं देणारा होता. पण तिला पडलेले प्रश्न हे प्रश्न तरी आहेत का हेच तिला ठरवता येत नव्हतं. त्यामुळे त्या संवादालाही काही अर्थ नव्हता. या सगळ्यातून येणारं तुटलेपण आणि एकटेपण मला दिसत होतं. या सगळ्यातून येणाऱ्या अतृप्ततेचं काय करायचं? ती सहारे शोधत राहते. तिला तिचा बॉस तिला समजून घेणारा वाटतो. अगदी त्याच्या त्या आध्यात्मिक कॅसेट्समधून बोलणाऱ्या स्वामींपासून ते रोज मोजकेच पेग पिण्यापर्यंतचं त्याचं सगळंच तिला पर्फेक्ट जगण्याचा मापदंड वाटू लागतं. त्याच्यासारखीच तीही सकाळी उठून हास्य क्लबला वगरे जाते. खूप हसल्यासारखं वाटतंही तिला. त्यानं कॉफी प्यायला बोलावणंही समाधान देतं. वाटतं, आपली ती समजण्यापलीकडची रिक्तता भरून निघणार आता. पण पाऊल अडखळतं. एक व्यक्ती म्हणून मला काहीही वाटो, लेखक म्हणून तिचा पाय घरातच अडवला मी. बॉसचे, मेहतांचे असंख्य मिस्ड कॉल्स येत राहतात. ती घरी येते. मुलगा सिगारेट पिताना दिसतो. त्याच्या असुरक्षिततेचा, रिक्ततेचा त्यानं शोधलेला सहारा. ती रागावत नाही. तो वैतागतो. म्हणतो, ‘‘आजकाल जग बदललंय. मुलीसुद्धा पितात.’’ मग तो सांगून टाकतो, ‘‘मी बीअरही पितो अनेकदा. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता एका मर्यादेपेक्षा अधिक नाही ढवळाढवळ करायची एकमेकांच्या आयुष्यात.’’ ती म्हणून जाते, ‘‘मला चालेल. तुला चालेल?’’ इथे अनघाच्या मानेवरचं ते शतकानुशतकांच्या चाकोरीबद्ध विचारांचं जू तिच्या हाताला लागतं. आणि ती म्हणते, ‘‘तुला चालेल? तुझी आई तिच्या बॉसबरोबर कॉफी प्यायला गेलेली चालेल? आणि आज कॉफी प्यायला आणि उद्या त्याच्याही पुढं गेलेली चालेल?’’ ती सांगू पाहते तिची घुसमट होतेय.        आता या प्रश्नोत्तरांच्या खेळात आधुनिक जगाचं तुणतुणं वाजवत असणारा मुलगा सावध होतो. वाद घालतो. आणि तिला जाणवतं ते बाईपण आणि त्यासोबतचं ते आईपण दोन्ही घट्ट चिकटून बसलंय. नाळ तुटते पण पाश नाहीत तुटत.

नाटकात तिच्या समांतर टीव्हीच्या पडद्यावरची सावित्री आहे. छोटय़ा पडद्यावरची आदर्श स्त्री.  नवऱ्याचं अफेयरही गोड मानून घेणारी. एक मत्रीण आहे जवळची विशाखा. डिट्टो तिच्यासारखीच पण तिला वेगळा ताल नाही ऐकू येत. तिची पावलं भवतालच्या कोलाहलाच्याच तालावर पडताहेत. तीही सुखी नाहीच्चेय. मुलाची गर्लफ्रेंड आहे. अत्यंत प्रॅक्टिकल. प्रेग्नंट न राहण्याची काळजी घेत छान जगणारी. या सगळ्या स्त्रियांमध्ये अनघा काही वेगळं शोधू पाहतेय. कोलाहलात अंत:स्वर जपू पाहतेय.

तिच्या भावविश्वातलं एक जग आहे. छोटय़ा पडद्याने तिला जगण्याच्या काही मोजपट्टय़ा दिल्यात. एक वास्तव जग आहे. त्या  वास्तवाला त्या मोजपट्टय़ांबरहुकूम सुंदर करण्याची तिची धडपड आहे. त्या धडपडीतून येणारा ताण आहे. त्यासाठी काय काय गमवावं लागलंय त्याची यादी भीषण आहे. घरातल्या मायेच्या माणसांपासून ते मुक्त मोकळ्या सच्च्या खळखळाटी हसण्यापर्यंतचं बरंच काही. आणि ते मिळू लागत असतानाच त्यातली निर्थकता जाणवतेय आणि जगणं अधिकच केविलवाणं होताना दिसतंय. अशा स्थितीतली अनघा अस्वस्थ आहे. ज्या अस्वस्थतेला तिला नेमक्या शब्दात मांडता येत नाहीये. म्हणून मग नवरा, मुलगा सगळेच त्याला हिचं सगळंच विचित्र या सदरात ढकलून मोकळे होत आहेत.

मग ती गणोरकरबाईंना भेटायला जाते.पण बाई तर जग सोडून गेलेल्या. अनघा परतते रिक्त हातानं. पण रिक्त मनानं नाही. ती आतून तुटलीये, शेकडो तुकडय़ांत विभागलीये. तिला खरा प्रश्नच ओळखू येत नाहीये. पण परतते ती शोध कायम ठेवायचा या विचारानं. मला वाटतं तिचं अतृप्त असणं आणि बाईंची भेट न झाल्यानं रिक्त हस्तानं परत येणं हा तिचा प्रवास एका नव्या वाटेवर तिला आणून सोडतो. सध्या ती वाट तिला दिसत नाहीये. म्हणून ती इतरांसारखीच हरवलीये. टीव्हीवरच्या हरवलेल्या माणसांच्या यादीत तिचंही नाव पुकारलं गेलं असलं तरी हे तिचं हरवणं गरजेचं होतं. ती म्हणते, ‘नको मानसचा शोध घ्यायला कदाचित् त्याचा त्यालाच शोध लागेल.’ अनघा हे त्याच्याबद्दल म्हणते की स्वत:बद्दलसुद्धा?

वर वर पाहणाऱ्यांना लक्षात येणार नाही पण हेच नाटय़ात्म विधान आहे नाटकातलं. कदाचित म्हणूनच हे नाटक आवडलं धाडस करणाऱ्या निर्मात्या लता नार्वेकरांना. आणि दिग्दíशका प्रतिमा कुलकर्णीना. दोघींना अनघा जवळची वाटली असावी का? ते २००२ मध्ये आलं. भारती आचरेकरांनी मोठय़ा ताकदीनं अनघा उभी केली. नंतरही हे नाटक होतंच आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशननं ते मराठीत प्रकाशित केलं. ‘नटरंग’ दिल्लीने ते हिंदीत प्रकाशित केलं त्याचा एक प्रयोगही केला. २०१२ ला. मग दिल्लीतल्याच एका ग्रूपने त्याचे अनेक प्रयोग केले. ‘अकॅडेमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांसाठी कुमार सोहोनी यांनी ते दिग्दíशत केलं.

अनघा सतत स्टेजवर दिसत राहतेय. आणि दरवेळी मला ती थोडी परिचित, थोडी अनोळखी वाटते. मला तिच्याबद्दल एक आतून येणारा उमाळा आहे. कारण सोप्या-सुलभ पळवाटा किंवा उत्तरं यात ती अडकलेली नाही. तिच्याकडे निश्चित वाटही नाही. धूसरतेतूनच चालत सुटलीये ती.. निरुत्तर राहिले तरी चालेल पण नि:प्रश्न जगणार नाही म्हणत.. आपला अंत:स्वर ऐकू पाहतेय..

abhiram.db@gmail.com

chaturang@expressindia.com