17 December 2017

News Flash

‘ल्होत्से एव्हरेस्ट २०१३’ मोहीम

जगातील सर्वोच्च शिखर म्हणजेच एव्हरेस्टवरील सर्वात मोठय़ा नागरी मोहिमेच्या आयोजनानंतर ‘गिरिप्रेमी’ने ८००० मीटर उंचीवरील

प्रतिनिधी | Updated: January 2, 2013 1:39 AM

जगातील सर्वोच्च शिखर म्हणजेच एव्हरेस्टवरील सर्वात मोठय़ा नागरी मोहिमेच्या आयोजनानंतर ‘गिरिप्रेमी’ने ८००० मीटर उंचीवरील आणखी एका शिखरावर महत्त्वाकांक्षी गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन केले आहे.
माउंट ‘ल्होत्से’ – उंची ८५१६ मी. म्हणजेच २७९४०  फूट – हे जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. एव्हरेस्ट, के २, कांचनजंगा, ल्होत्से या क्रमवारीतील ‘ल्होत्से’ हे अत्यंत कठीण हिमशिखर मानले जाते. नुकत्याच झालेल्या जागतिक सर्वेक्षणामध्ये जगातील सर्वात अवघड अशा १० शिखरांमध्ये ‘ल्होत्से’ चा समावेश करण्यात आला आहे. माउंट एव्हरेस्टच्या दक्षिण धारेस ल्होत्से शिखर जोडलेले असून तिबेट आणि नेपाळच्या सीमेवर हे हिमशिखर स्थित आहे. ल्होत्से शिखर चढाईसाठी जगभरातून आजवर अनेक प्रयत्न झाले परंतु यश खूपच कमी संघांना मिळू शकले.
शिखरावर जाण्यासाठी २ प्रमुख मार्ग आहेत, ज्यापैकी एक दक्षिण कडय़ावरून तर दुसरा उत्तर पश्चिम धारेवरून. शिखराच्या माथ्याजवळचा मार्ग अतिशय अरूंद असून शिखरमाथ्यावर ४-५ गिर्यारोहक जेमतेम उभे राहतील इतकीच जागा आहे. दक्षिण धार संपूर्ण जगामध्ये खडय़ा चढाईसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे १.९ मैल इतकी खडी चढण अनेक गिर्यारोहण मोहिमांच्या अपयशाचे कारण ठरली आहे. तसेच शिखरावरून वेगाने गडगडत येणाऱ्या लहान मोठय़ा दगडांचा धोकादेखील आहे. याच कारणांमुळे जगातील ८००० मीटरवरील उंच शिखरांमध्ये सर्वात कमी प्रयत्न ल्होत्से शिखरचढाईसाठी होतात.
ल्होत्सेवरील पहिली यशस्वी चढाई १९५६ मध्ये   स्वीस गिर्यारोहकांनी केली. भारतातून ल्होत्से शिखरासाठी फारच   कमी प्रयत्न झाले असून त्यापैकी सेनादलाच्या काही मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.
गिरिप्रेमीची मोहीम उत्तर पश्चिम धारेवरून चढाई करणार आहे. या बाजूचा पहिल्या तीन तळांपर्यंतचा मार्ग ल्होत्से आणि माउंट एव्हरेस्ट या दोन्ही शिखरांसाठी एकच आहे. त्यामुळे यावर्षी यशस्वी झालेल्या पुणे एव्हरेस्ट २०१२ मोहिमेच्या अनुभवाचा ‘गिरिप्रेमी’ला नक्कीच फायदा होणार आहे. पुणे एव्हरेस्ट २०१२ मोहिमेमध्ये ८ गिर्यारोहकांच्या संघाने माउंट एव्हरेस्ट सर करून भारतीय गिर्यारोहणाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या मोहिमेच्या उत्तुंग यशानंतर गिरिप्रेमीने या आणखी एका महत्त्वाकांक्षी मोहिमेचे आयोजन केले आहे. २०१३ वर्षीच्या मे महिन्यामध्ये ल्होत्से आणि एव्हरेस्ट या दोनही शिखरांवर एकाच मोहिमेअंतर्गत भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवून ऐतिहासिक कामगिरी करून दाखविण्यासाठी ‘गिरिप्रेमी’चा संघ सज्ज होत आहे. २०१३ हे वर्ष माउंट एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी चढाईचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. हे निमित्त साधून गिर्यारोहण या साहसी क्रीडाप्रकारात महाराष्ट्राचे, तसेच भारताचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर झळकविण्यासाठी या मोहिमेचे आयोजन होत आहे.
जगात ८००० मीटर पेक्षा उंच अशी केवळ १४ हिमशिखरे आहेत ज्यांना गिर्यारोहण परिभाषेत ‘एट-थाऊजंडर्स’ म्हणतात. ही सर्वच्या सर्व १४ शिखरे सर करणारे जगात आज अत्यंत कमी गिर्यारोहक आहेत आणि भारतातून तर असा कोणीही नाही. भारतीयांनी आजवर अशी ६ ‘एट-थाऊजंडर्स’ सर केली आहेत. येत्या काही वर्षांत गिरिप्रेमीच्या माध्यमातून या १४ च्या १४ शिखरांवर भारताचा तिरंगा फडकावा यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहे. त्याच प्रयत्नातील ल्होत्से हे पुढचे पाऊल पडते आहे. ल्होत्से आणि एव्हरेस्ट या दोन्ही शिखरांवर एकाच वेळी चढाईचा प्रयत्न करणारी ही भारतातील पहिलीच नागरी मोहीम आहे.
मोहिमेचा कालावधी एप्रिल – मे २०१३ हा असेल. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली आनंद माळी, टेकराज अधिकारी, भूषण हर्षे, गणेश मोरे, आशीष माने यांचा या मोहिमेमध्ये सहभाग आहे. मोहिमेचा एकूण खर्च सुमारे ९० लाख रुपये असून गतवर्षीच्या पुणे एव्हरेस्ट २०१२ मोहिमेच्या निधी उभारणीनंतर हा निधी उभा करण्याचे आव्हान पुन्हा एकदा ‘गिरिप्रेमी’समोर आहे. त्यासाठी गिरिप्रेमीचा संघ विविध मार्गानी प्रयत्नशील आहे. पुण्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व निसर्गप्रेमी व साहसप्रेमी नागरिकांनी ल्होत्से शिखराच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेला भरभरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन गिरिप्रेमीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (अविनाश कांदेकर – ९८८१२३४५०२), (निरंजन पळसुले – ९८५०५१४३८०)   

First Published on January 2, 2013 1:39 am

Web Title: lhotse everest 2013