बॅकपॅक
गिरिभ्रमण, गिर्यारोहण, जंगल भ्रमंती असे छंद जोपासायचे म्हणजेच वाटा-आडवाटांवर चालायचे, भटकायचे. मग या भटकंतीतील मुक्कामही अशाच कुठेतरी अनगड जागीचे. जिथे ना छत, ना आसरा..बिछाना वगैरे तर खूप दूरच्या कल्पना. आपले अंथरूण-पांघरूण आपणच घ्यायचे. यातूनच मग चादर-सतरंजीपासून सुरू झालेला हा प्रवास विविध अडचणी, आव्हाने, गरज आणि उपयुक्तता यांचा विचार करत ‘स्लिपिंग बॅग’ आणि ‘कॅरीमॅट’वर स्थिरावला.
गिरिभ्रमण, गिर्यारोहणात सॅकपाठोपाठ या दोन्ही गरजेच्या वस्तू. यामुळेच ट्रेकला निघालेल्या बहुतेकांच्या सॅकच्या पाठीवर या अशा ‘स्लिपिंग बॅग’ आणि ‘कॅरीमॅट’ची भेंडोळी लटकलेली दिसतात. या जगापासून चार हात दूर असणाऱ्यांना या अशा भेंडोळय़ांबद्दल मोठे कुतूहल असते तर प्रत्यक्षात त्याचा वापर करणाऱ्यांना त्याची फारशी माहिती नसते. यातीलच ‘स्लिपिंग बॅग’बद्दल आज पाहूयात.
जास्तीत-जास्त उब-सुरक्षा, कमीतकमी लागणारी जागा, एरवीच्या अंथरूण-पांघरूणापेक्षा कमी असलेले वजन आणि ट्रेकमध्ये वागवायला सोपे यातून ‘स्लिपिंग बॅग’चा उदय झाला. उबदार आवरण असलेली ही एक प्रकारची पिशवीच. या पिशवीत स्वत:ला घालून घेतले की थंडी, वारा, गारठा एवढेच काय किडय़ा-मुंगीपासून ते सरपटणाऱ्या जीवापर्यंत साऱ्यांपासून सुटका आणि सुरक्षा.
‘स्लिपिंग बॅग’ची ही पिशवी आतील-बाहेरील अशी दोन आवरणे आणि त्यात मधोमध भरलेल्या ‘इन्शुलेशन’पासून तयार होते. यातील बाहेरील आवरण हे सामान्यत: नायलॉन वा पॉलिस्टरपासून बनलेले असते. तर आतील कापड सच्छिद्र-हवा खेळती ठेवणारे असते. अशा या दोन कापडांमध्ये वरील ‘इन्शुलेशन’ म्हणून पक्ष्यांची पिसे नाहीतर सिंथेटिकचे धागे भरलेले असतात. ‘इन्शुलेशन’च्या या थरामुळे ‘स्लिपिंग बॅग’च्या आतील तापमान कायम राखण्यात मदत होते. थोडक्यात बाहेरील थंडी-गारठा आतमध्ये शिरत नाही. यातही पक्ष्यांच्या पिसांचे ‘इन्शुलेशन’ असलेल्या ‘स्लिपिंग बॅग’अधिक उबदार असतात. यासाठीही युरोपात अतिथंडीच्या प्रदेशात जिथे तापमान काही उणे अंश सेल्सियस होते, तिथल्या बदकांच्या जातींची निवड केली जाते. या बदकांच्या पोटाकडील भागाची पिसे यासाठी घेतली जातात.
‘ममी शेप’ आणि आयताकृती अशा दोन आकारात या ‘स्लिपिंग बॅग’ तयार केल्या जातात. यातील ‘ममी’ आकारात त्याच्या नावाप्रमाणे पायाकडील भाग निमुळता होतो तर तेच आयताकृतीमध्ये तो मोठय़ा आकाराचा राहतो. यात एकाचे वजन घटते तर एकात झोपताना पायाशी मोकळी जागा मिळते. शेवटी ही ज्याची-त्याची निवड आणि गरज!
आतापर्यंतच्या चर्चेतून हे लक्षात आले असेल, की झोपण्याच्या या पिशवीचे उबेशी नाते आहे. यामुळे तिची निवड, प्रकार आणि मोजण्याचे परिमाणही या तापमानाशी जोडलेले आहे. जगभरात सर्वत्र ‘स्लिपिंग बॅग’ या तापमानावरच मोजल्या, विकल्या आणि वापरल्या जातात. आपली भटकंती कुठल्या प्रकारची, कुठल्या तापमानात होणारी आहे, यावर ही ‘स्लिपिंग बॅग’ निवडायची. पाश्चात्य देशात अशा प्रकारच्या तापमान मोजणाऱ्या काही प्रयोगशाळा देखील आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या या ‘स्लिपिंग बॅग’वर तिच्या वापरासाठी तापमानाच्या विविध पातळय़ा दिलेल्या असतात. या तापमानानुसारच दैनंदिन किंवा सह्य़ाद्रीत वापरण्यासाठी ते हिमालयातील अतिउंचीवरील मोहिमांसाठीच्या ‘स्लिपिंग बॅग’ तयार केल्या जातात. बाजारात यानुसारच त्यांची विक्री होते. सध्या छोटय़ा-मोठय़ा गिरिभ्रमणासाठी वाइल्डक्राप्ट, पिक, केचुवा तर अतिउंचीवरील मोहिमांसाठी नॉर्थ फेस, मरमॉट, माउंटन हार्डवेअर, कॅम्प आदी ब्रँडच्या ‘स्लिपिंग बॅग’ बाजारात उपलब्ध आहेत. यांच्या किमती बाराशेपासून ते एक हजार डॉलपर्यंत अशा वेगवेगळय़ा आहेत.
अशा या ‘स्लिपिंग बॅग’च्या वापराबाबत चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या जातात. वापर झाल्यावर ‘स्लिपिंग बॅग’ कधीही गुंडाळी करून ठेवू नये. उभी किंवा टांगून ठेवू नये. अशा करण्यामुळे तिच्यातील ‘इन्शुलेशन’ खराब होते. ती नेहमी आडवी पसरून ठेवावी. खराब झाल्यास ती हाताने धुवावी. थेट सूर्यप्रकाशात, पाण्याच्या संपर्कात ‘स्लिपिंग बॅग’ येऊ देऊ नये. माती, घाण, बुरशीपासूनच्या बचावासाठी ती सतत स्वच्छ आणि हवेशीर वातावरणात ठेवावी. वाटा-आडवाटांवर मायेची ऊब देणाऱ्या या पिशवीची एवढी काळजी नक्कीच घ्यायला हवी. अशी ही ‘स्लिपिंग बॅग’ तिच्या जोडीच्या ‘कॅरीमॅट’बद्दल पुढील भागात माहिती घेऊयात.
(अधिक माहितीसाठी मुफी लोखंडवाला (९८२२३९७७४१) यांच्याशी किंवा http://www.gypsytents.com  या संकेतस्थळाला भेट द्या.)
abhijit.belhekar@ expressindia.com