16 December 2017

News Flash

हरिश्चंद्रनाम पर्वतू!

‘हरिश्चंद्रगड’ या शब्दाला भटक्यांच्या जीवनात एक आगळेवेगळे स्थान आहे. उंच उंच पर्वतरांगा, त्यावरची डोंगरशिखरे,

अभिजित बेल्हेकर - abhijit.belhekar@expressindia.com | Updated: November 27, 2012 11:24 AM

‘हरिश्चंद्रगड’ या शब्दाला भटक्यांच्या जीवनात एक आगळेवेगळे स्थान आहे. उंच उंच पर्वतरांगा, त्यावरची डोंगरशिखरे, भय दाखविणारे खोल कडे, नद्या-नाले, समृद्ध वन्यजीवन, इतिहास सांगणारा गड, प्राचीन कलेचा वारसा जोपासणारी लेणी-मंदिरे या साऱ्या अंगा-उपांगांनी हा पर्वत बहरलाय.. त्यामुळेच खऱ्याखुऱ्या भटक्याला या ‘हरिश्चंद्रनामा पर्वतू’कडे धावणाऱ्या वाटा या कायम आषाढी-कार्तिकीच्या वाटतात. पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्हय़ांच्या सीमेवर ऐन घाटमाथ्यावर आभाळात उंच जागी (१४२४ मीटर) वसलेला हा गिरिदुर्ग अणे-माळशेज रस्त्यालगत आहे. खिरेश्वर त्याच्या पायथ्याचे गाव. या खिरेश्वर गावी येण्यासाठी पुणे, जुन्नर, ओतूरहून थेट एसटी बससेवा आहे. याशिवाय अन्य भागातून येणाऱ्यांसाठी माळशेज मार्गे धावणाऱ्या कुठल्याही बसने खुबी फाटय़ाला उतरत हे खिरेश्वर गाव जवळ करता येते. हरिश्चंद्रगडला जाण्यासाठी या खिरेश्वर गावी आदल्या दिवशी मुक्कामाला यावे. गडावर निघण्यापूर्वी या गावातच दडलेले नागेश्वर मंदिराचे नवल आवर्जून पाहावे. शिलाहार वंशातील झंज नावाच्या राजाने दहाव्या शतकात हे मंदिर बांधले. नाशिकच्या गोदावरीपासून भीमाशंकरच्या भीमेपर्यंत तब्बल १२ नद्यांच्या उगमस्थळी या झंज राजाने मंदिरे बांधली. यातीलच पुष्पावती नदी उगमस्थळावरचे हे नागेश्वर मंदिर! बाहेरून साधेसुधे वाटणाऱ्या या मंदिरात शिरल्यावर आतील त्याची कोरीव श्रीमंती नजरेत सामावत नाही. विविध भौमितिक आकारातील स्तंभ, त्यांना यक्षांचे दिलेले आधार, भिंतीतील देवकोष्टे, विविध रूपकांनी सजवलेले प्रवेशद्वार आणि सर्वात महत्त्वाचे छतालगत लगडलेले वैदिक देवतांचे शिल्पपट हे सारे सारेच विलक्षण आहे. हे सारे साठवायचे आणि टोलार खिंडी मार्गे गडाकडे निघायचे.
या गिरिदुर्गावर जाण्यासाठी तब्बल पाच वाटा धावतात. यातील पुण्या-मुंबईसाठी माळशेज घाटाअलीकडे खुबी, खिरेश्वर, टोलार खिंड मार्गे तर नगरकडून पाचनई आणि कोथळय़ातून अन्य दोन वाटा गडावर येतात. याशिवाय खिरेश्वरच्याच बाजूने जुन्नर दरवाजाची नळीची ऊर्फ राजघरची आणि कोकणकडय़ालगतच्या साधले घाटातून चढणारी वाट ही छातीलगत कडे चढणाऱ्यांची हौस पुरविणारी आहे. असो! आपण टोलार खिंडीतून गडाकडे निघायचे.
गाव सोडताच भोवतालची झाडी घट्ट होत जंगलची वाट आल्याचा अनुभव येतो. आंबा, हिरडा, बेहडा, आवळा, पिसा, जांभूळ, करवंद, आळीव, करप, करंबू, उंबर, लोध आदी वृक्ष- वनस्पतींचा हा पसारा. यातही विशिष्ट ऋतूत-विशिष्ट वर्षी गेलो की कारवी, आकरा, सोनकी आदी रानफुलांचा उत्सव पाहण्यास मिळतो. वनस्पतींप्रमाणेच सांबर, भेकर, रानमांजर, साळिंदर, तरस, कोल्हा आणि बिबटय़ा यांची अधेमधे चाहूल लागते किंवा हूल तरी नक्कीच पडते. या शांत रानी गरुड, घार, गिधाड, घुबड, बुलबुल, स्वर्गीय नर्तक, कोतवाल, हळद्या, निळकंठ, चंडोल, खाटीक, धोबी, तांबट, वेडा राघू असे एक ना दोन असंख्य पक्षी धिंगाणा घालत असतात. ‘शेकरू’ तर या जंगलचीच राणी! मध्येच कधीतरी राजघर वाटेवरचे ते नेढेही दूरवरून दिसते. या साऱ्या वन्यजीवनाची साथ आता गड उतरेपर्यंत राहणार असते. या अशा संपन्न अधिवासाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून ‘हरिश्चंद्रगड-कळसूबाई’ अशा अभयारण्याचे कवच घालण्यात आले आहे. जंगलचे हे कौतुक करतच आपण टोलार खिंडीत येऊन पोहोचतो. मन या हिरवाईत पूर्ण बुडालेले असतानाच कुठूनतरी ती वाईट बातमी आदळली.
‘हरिश्चंद्रगडाच्या या टोलार खिंडीपर्यंत रस्ता आणण्याच्या हालचाली सुरू आहेत..’
एकदम मिठाचा खडा लागल्यासारखा झाला! पर्यटन विकास आणि पर्यटकांच्या सोयीच्या नावाखाली या अशा अनेक गोष्टी होऊ लागल्या, की सुन्न व्हायला होते. ज्याच्या जिवावर पर्यटन मांडायचे, पाहायचे त्या निसर्ग-इतिहासालाच नष्ट करत कुठला पर्यटन विकास तुम्ही साधणार आहात? एकीकडे अभयारण्य करत तो भाग संरक्षित करायचा आणि दुसरीकडे त्यात रस्ते काढत तो पुन्हा माणसा-वाहनांसाठी खुला करायचा हे कसले धोरण? आम्ही एखादा भाग तरी त्याच्या नैसर्गिक अवस्थेत जतन करणार, वाचवणार आहोत की नाही?..असो! उद्याच्या या भीतीतून आजची ही निसर्ग शांतता अधिकाधिक साठवून घ्यायची.
 नगर आणि पुण्याला जोडणारी ही जंगलवाटेवरची टोलार खिंड, इथेच कोथळय़ाकडून येणारी वाटही येऊन मिळते. या खिंडीत दोन-तीन शेंदूर लावलेले वनदेव आणि वाघाचे एक शिल्प आहे. या देवांना नमस्कार करायचा आणि एखाद्या आदिवासी जोडीदाराबरोबर गप्पा मारत पुढच्या वाटेला लागायचे.
टोलार खिंडीनंतर एकदम कातळातील खडी चढण सुरू होते. यासाठी इथे खोबण्यांचा रस्ता तयार केला आहे. ही चढण आणि त्यानंतरचे चार किलोमीटरचे सपाटीवरचे चालणे पार केले, की आपण गडमाथ्यावरील हरिश्चंद्रेश्वराच्या प्रांगणात येऊन दाखल होतो. या अनगड रानात एक देखणे शैलमंदिर समोर उभे असते. पावसाळय़ात आला तर त्याभोवती रानफुलांची प्रभावळ असते. हे मंदिर, डावीकडची लेणी, पाण्याने भरलेली पुष्करणी हे सारे पाहून थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि नव्या उमेदीने गडदर्शन सुरू होते.
हरिश्चंद्रगडाचा इतिहास शोधू लागलो, की मौखिक परंपरेने ही गडकथा अगदी राजा हरिश्चंद्रापर्यंत नेली जाते. यासाठी गडावरील हरिश्चंद्र, तारामती, रोहिदासची शिखरे, विश्वामित्र आणि डोंबाच्या घुमटीकडे बोट दाखविले जाते. पण दुसरीकडे गडाचा साधार इतिहास पाहू लागलो की आपण थेट पाचव्या-सहाव्या शतकातील त्रिकुटक आणि कलचुरी राजघराण्यांत पोहोचतो. त्यानंतर निर्माण झालेली ही गडावरची हिंदू लेणी, दहाव्या शतकातील हरिश्चंद्रेश्वर मदिरांचे निर्माण आणि त्यानंतरचे संतकवी चांगदेवांचे इथले वास्तव्य हा भला मोठा प्रवास समोर उभा राहतो. इतिहासाच्या या वाटेवरच तारामती शिखराच्या पोटातील हिंदू लेणी पाहायची. ओळीने पाच-सहा असलेल्या या लेण्यांमध्येच एका दालनात गणेशाचे भव्य शिल्प कोरलेले आहे. या लेण्यांच्या समोरचा भाग म्हणजेच गडाचा बालेकिल्ला. काही घरा-वाडय़ांचे अवशेष, पाण्याचे हौद, छोटी-मोठी मंदिरे याच भागात आहेत. ब्रिटिशांनी १८२०मध्ये गड जिंकल्यावर ही सारी बांधकामे आणि गडाचे तट-दरवाजे पाडून टाकले. या हल्ल्यातून बचावली ती गडावरची पुष्करणी आणि हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर!
पुष्करणीच्या एका अंगास ओळीने चौदा कोनाडे. ज्यामध्ये आता १९८४ पर्यंत विविध देवतांच्या मूर्ती होत्या. पुढे सुरक्षेच्या कारणावरून त्या हरिश्चंद्रेश्वर मंदिरातीलच एका खोलीत ठेवल्या आहेत. १९७०च्या सुमारास या गडावर राहात असलेल्या एका महाराजांनी या पुष्करणीची साफसफाईची टूम उठवली होती. या वेळी त्याला दोन पोती भरतील एवढी चांदीची नाणी मिळाली. या नाण्यांपासून चांदीचा मुखवटा करायचा म्हणून ती इथून हलविली गेली. पण पुढे हा मुखवटाही झाला नाही आणि त्यापेक्षाही इतिहासाची अस्सल साधने असलेली नाणीही लांबविली गेली. ही देखणी पुष्करणी पाहायची आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात उभे ठाकायचे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
गडावर आल्या आल्या डोळय़ांत भरणारे हे कातळशिल्प! संत चांगदेवांनी नाव दिलेल्या मंगळगंगा नदीच्या काठावर एका लवणात हे देखणे शैलमंदिर उभे आहे. तट, तटालगत खोदलेल्या ओवऱ्या, थंडगार पाण्याच्या टाक्या आणि या प्राकारात मधोमध कोरलेले-बांधलेले हे देखणे मंदिर! ‘नागेश्वर’प्रमाणेच झंज राजानेच मंगळगंगा ऊर्फ मुळा नदीच्या उगमस्थळी याही मंदिराची निर्मिती केली.
पूर्व दिशेस असलेल्या प्रवेशद्वारातून या प्राकारात शिरावे. या दरवाजाच्या दोन्ही अंगांना कीर्तिमुखांची भव्य शिल्पं आहेत. डाव्या भिंतीवर एक महत्त्वाचा लेखही!
‘चक्रपाणी वटेश्वर : नन्दतु तस्य सुत : वीकट देऊ ॐ ’
निसर्गशिल्पाने भारावलेली ही भूमी संत चांगदेवांनाही भावली. मग त्यांनीही त्यांच्या तपश्चर्येसाठी हा हरिश्चंद्रगड निवडला. हरिश्चंद्रेश्वराच्या या मंदिरात सहा, तर शेजारच्याच केदारेश्वराच्या लेण्यात दोन असे आठ लेख चांगदेवांच्या या वास्तव्याचे पुरावे देतात. ज्येष्ठ साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर, डॉ. वि. भि. कोलते आणि डॉ. रा. चिं. ढेरे यांनी परिश्रमपूर्वक या लेखांचे संशोधन करत त्यांचे तेराव्या शतकातील संत चांगदेव, ज्ञानदेव आणि निवृत्तिनाथ या संतमहात्म्यांशी असलेले नाते समाजापुढे आणले. डॉ. ढेरे यांच्या मते या प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवरही आणखी एक लेख होता. पण त्याची अक्षरे पुसट झाल्याने आज तो वाचता येत नाही.
आत शिरताच मधोमध अवकाशात उंच शिखर नेलेले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. या मंदिराच्या भोवतीने दक्षिण आणि पश्चिम दिशांना काही कोरीव लेण्यांची दालने आणि पाण्याच्या टाक्या आहेत. मुख्य मंदिरास पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग आणि त्याच्या पुढय़ात नंदी विराजमान आहे. अशा या मंदिराच्या शिखर, भिंती, खांब आणि प्रवेशद्वार सर्वत्र मुक्तहस्ते शिल्पकाम केलेले आहे. देव-देवता, प्राणी, रत्न-रूप, -निसर्ग आदी रूपके, विविध भौमितिक रचना या साऱ्यांची एक विलक्षण वीण या भरजरी कामात गुंफलेली आहे. यामुळेच अभ्यासक या रचनेची तुलना उत्तरेतील बुद्धगयेच्या मंदिराशी करतात. हरिश्चंद्रेश्वराचे हे सौंदर्य पाहणाऱ्यांची मती काही क्षण गुंग करून टाकते. याची हीच भूल संत चांगदेवांनाही पडली आणि म्हणूनच त्यांनी तपश्चर्येसाठी हा भाग निवडला. इथल्या त्यांच्या या वास्तव्यात त्यांनी ‘तत्त्वसार’ हा ग्रंथ कार्यसिद्धीस नेला. या ग्रंथातील १०२८ ते ३३ दरम्यानच्या ओव्यांमध्ये या गडाचा उल्लेख आलेला आहे, तो असा,
‘हरिश्चंद्र नाम पर्वतु।
तेथ महादेओ भवतु।।
सुरसिद्ध गणी विख्यातु।
सेविजे जो।।१०२९।।
हरिश्चंद्र देवता। मंगळगंगा सरिता।।
सर्वतीर्थ पुरविता। सप्तस्थान।। १०३०।।’
तत्त्वसारप्रमाणेच स्कंद, पद्म, अग्नी, मस्य पुराणांतही या हरिश्चंद्र पर्वताची माहिती येते.
हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराशेजारीच ओढय़ालगत कातळात खोदलेले केदारेश्वराचे लेणे आहे. औरस-चौरस असलेल्या या लेण्यात कमरेएवढे पाणी असून त्याच्या मधोमध एका मोठय़ा ओटय़ावर विशाल शिवलिंग आहे. या शिवलिंगाभोवती चार सालंकृत खांबांची रचना केली आहे. यातील एक पूर्णपणे, तर दोन अध्र्यापर्यंत पडलेले आहेत. या लेण्याच्या डावीकडील भिंतीवर शिवपूजेचा एक शिल्पपटही कोरला आहे. उरी इच्छा आणि मनी श्रद्धा असेल तर त्या थंडगार पाण्यातही स्वत:ला झोकून देत ‘त्या’ शिवाला प्रदक्षिणा घालायची आणि हर हर महादेवच्या गर्जनांनी ते लेणे जागवायचे!
कोकणकडय़ाचे विराट दर्शन
हा सारा इतिहास पाहून झाला की हरिश्चंद्रगडाचा भूगोल पाहण्यासाठी वळायचे. महाराष्ट्रात सहय़ाद्रीमुळे देश आणि कोकण असे दोन भाग तयार झाले. या भौगोलिक रचनेतून घाटमाथा जन्माला आला. ज्या घाटमाथ्यालगत आपल्याला जागोजागी कोकणकडे दिसतात. या साऱ्या कोकणकडय़ांचा स्वामी शोधायचा ठरले तर तो मान हरिश्चंद्रगडाच्या कडय़ाला द्यावा लागेल. दोन अडीच हजार फूट सरळ तुटलेला या कडय़ाचे दर्शन म्हणजे अंगावर काटा आणि पोटात धडकी भरविणारे आहे. जवळजवळ अर्धाएक किलोमीटर परिघाचा हा कडा अंतर्वक्र स्वरूपाचा आहे. खपाटीला गेलेले पोट आणि खोलवर बुडालेली नजर! झोपून, एकमेकांना सावरतच हे सारे रौद्ररूप पाहायचे. जणू या भूमीचेच हे विराट दर्शन!
याच कोकणकडय़ावर १८३५ मध्ये एक अक्रीत घडले. हरिश्चंद्रगडाच्या ओढीने इथे येणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये कर्नल साईक्सही या गडावर आला होता. एके सकाळी, सूर्योदयावेळी घोडय़ावर बसून तो या कडय़ावर येतो तर काय समोरच्या दरीतून वर उठणाऱ्या धुकटय़ात त्याला चक्क स्वत:चे प्रतिबिंब पाहायला मिळाले आणि या प्रतिबिंबाभोवती वर्तुळाकृती इंद्रधनूनेही फेर धरलेला. अशा प्रकारे ‘इंद्रवज्र’ या वैज्ञानिक चमत्काराची नोंदही या गडावर झाली.
एकूणच ही हरिश्चंद्रगडाची भूमी प्राचीन इतिहास, संपन्न निसर्ग, आगळय़ावेगळय़ा भूगोलापासून ते अगदी संत वास्तव्य-साहित्यापर्यंत अनंत गोष्टींनी बहरलेली आहे. मग कधी इथला निसर्ग अनुभवण्यासाठी, कधी किल्ला पाहण्यासाठी, कधी त्यातले शिलालेख अभ्यासण्यासाठी आणि कधी निव्वळ गडावर येऊन शांततेत चार दिवस घालविण्यासाठी असे किती वेळा आणि कशा-कशासाठी गडावर येत राहायचे. २०१०च्या जून महिन्यातही गडावर असाच चार-पाच दिवसांसाठी मुक्काम लागला. कोकणकडय़ावर तंबू लागले.
रोज सकाळी त्या कोकणकडय़ाच्या पुढय़ातली दरी टिपण्यासाठी कॅमरेही सज्ज झाले. अशातच एकदा ‘ती’ भौगोलिक-हवामानाची स्थिती अनुकूल झाली आणि पुढय़ात साक्षात ‘इंद्रवज्र’ अवतरले. या गडाकडून आता आणखी काय हवे!

First Published on November 27, 2012 11:24 am

Web Title: trek it harichandra fort