03 June 2020

News Flash

सह्य़ाद्रीच्या आडवाटा

ठरलेल्या, मळलेल्या वाटा सोडून भटकायला अनेकांना आवडते.

ठरलेल्या, मळलेल्या वाटा सोडून भटकायला अनेकांना आवडते. अशांसाठीच नाशिक जिल्ह्य़ातील एका दुर्गचौकडी भोवतीच्या आडवाटांवरची ही भटकंती.

सप्टेंबर ते फेब्रुवारी या गिर्यारोहणासाठी सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या कालावधीत सकाळच्या धुक्यामध्ये स्वतच्या अभेद्य कडय़ांना हरवून टाकणाऱ्या सह्य़ाद्रीच्या सातमाळा, त्रिंबक, सेलबारी-डोलबारी अशा एकापेक्षा एक सरस अशा डोंगररांगांकडे ट्रेकर्सची पावलं सध्या वळू लागलेली आहेत. सरत्या पावसाळय़ाचे दिवस हा ‘ओव्हरनाईट ट्रेक्स’चा आदर्श कालावधी असल्याने साधारणपणे तीन-चार दिवसांचे भटकंतीचे कार्यक्रम आखले जातात. कळसूबाईच्या पूर्वेकडच्या रांगेत बितनगड, पट्टा, औंढा व आड असे सह्य़ाद्रीतले चार अतिशय दुर्गम दुर्ग आहेत. अपुऱ्या माहितीमुळे ट्रेकर्स या किल्ल्यांच्या वाटेला फारसे जात नाहीत.
नाशिक जिल्ह्य़ातल्या या चारही किल्ल्यांना भेट देण्यासाठी आपल्याला आधी पुणे-नाशिक महामार्गावरचं सिन्नर गाव गाठावं लागतं. सिन्नरमध्ये अप्रतिम कोरीव काम असलेलं गोंदेश्वर मंदिर व सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीतलं गारगोटी म्युझियम नक्कीच भेट द्यावं असं आहे. सिन्नरपासून ठाणगावला जाणाऱ्या रस्त्याने आपण निघालो की, साधारणपणे सहा-सात किलोमीटरवर डुबेरा नावाचं गाव लागतं. या डुबेरा गावामागेच हा अतिशय लहान आकाराचा डुबेरगड उभा आहे. हा किल्ला आहे हे स्थानिक ग्रामस्थांनाही माहिती नाही. ते याला केवळ ‘देवीचा डोंगर’ या नावाने ओळखतात. साधारणपणे वीस मिनिटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो की, उजवीकडे पाण्याची दोन टाकी खोदलेली दिसतात. किल्ल्यावर देवीचे देऊळ व एक तलाव एवढेच अवशेष आहेत. अध्र्या तासात किल्ला बघून झाला की, पुन्हा डुबेरा गावात येऊन ठाणगावकडे निघायचं. डुबेरा ते ठाणगाव हे अंतर सुमारे तीस किलोमीटर असून ठाणगावजवळच आता आपली मुख्य डोंगरयात्रा आहे. ठाणगावपासून सुमारे दहा किलोमीटरवर ‘वरची आडवाडी’ हे गाव असून या गावाच्या मागेच आडवातिडवा पसरलेला आड किल्ला आहे. ठाणगाव ते आडवाडी हा रस्ता या भागातल्या पवनचक्यांमुळे शेवटपर्यंत गुळगुळीत आहे. वरच्या आडवाडीतून साधारणपणे तासाभरात आडच्या माथ्यावर पोहोचलो की, किल्ल्याचा प्रचंड आकार लगेच लक्षात येतो. या किल्ल्यावर पाण्याची साठ-सत्तर टाकी खोदलेली आहेत. किल्ल्याच्या कातळकडय़ामध्ये देवीची गुहा असून ट्रेकर्सना मुक्कामासाठी हे उत्तम ठिकाण आहे. किल्ल्याच्या मध्यभागी एक छोटा उंचवटा असून या वाटेवर काही भग्नावशेष आहेत. या उंचवटय़ावर दोन स्मारके असून इथून समोर दिसणारा औंढा किल्ल्याचा सुळका आणि शेजारचा प्रचंड विस्ताराचा पट्टा किल्ला हे दृष्य साठवण्यासारखं आहे.
आडदर्शन झालं की पुन्हा ठाणगावला येऊन पट्टावाडीकडे निघायचं. ठाणगाव ते पट्टावाडी हे अंतर सुमारे पंधरा किलोमीटरचे. पट्टावाडीतून पट्टय़ाच्या पहिल्या गुहेपर्यंत पोहोचायला फक्त वीस मिनिटं लागतात. किल्ल्याच्या वाटेवर किल्ल्यावरूनच खाली आणलेली एक तोफ ठेवली आहे. पट्टय़ावरच्या या पहिल्या गुहेत लक्ष्मणगिरी महाराजांची समाधी असून गुहेला ग्रामस्थांनी बाहेरून लोखंडी दरवाजा लावून ती बंद केली आहे. गुहेच्या समोरून जाणारा मार्ग किल्ल्याच्या माथ्यावर जातो. पट्टय़ाच्या प्रचंड पठारावर एक सुस्थितीतला दरवाजा, एक अंबारखाना, पट्टाई देवीचे मंदिर व काही गुहा आहेत. पट्टय़ाच्या सर्वोच्च माथ्यावर एक सलग खोदलेली पाण्याची बारा टाकी असून किल्ल्याच्या उत्तर कडय़ावरून समोर दिसणारा औंढा किल्ल्याचा गगनभेदी सुळका म्हणजे भन्नाट प्रकार आहे. पट्टय़ापासून औंढय़ापर्यंत धावत गेलेल्या कोकणकडय़ासारख्या डोंगररांगेवरून चालत औंढा किल्ल्यावर जाता येते. औंढय़ाचं हे दृश्य काय वर्णावं! सह्याद्रीची सगळी वैशिष्टय़ या एकाच दृश्यात सामावली आहेत. सध्या या डोंगररांगेवर पवनचक्क्यांची फौजच उभी केली गेली असल्याने पट्टावाडीतून गडाच्या परिघाला संपूर्ण वळसा मारून एक गाडीरस्ता तयार केला आहे. हा या औंढय़ाच्या बेलाग सुळक्यापर्यंत नेऊन पोहोचवण्यात आला आहे.
पट्टा बघून झाला की, आपल्याला दोन पर्याय आहेत. पट्टय़ाच्या पश्चिम पायथ्याच्या कोकणवाडीतून गेलेल्या रस्त्याने औंढय़ाला जायचं किंवा थेट बितनगड गाठायचा. औंढा किल्ल्याचा माथा गाठण्यासाठी सुमारे साठ-सत्तर फुटांचा मध्यम श्रेणीतला ‘रॉकपॅच’ असून तो चढण्यासाठी दोराची गरज भासते. यामुळे ज्यांच्याकडे दोर नाही आणि ज्यांना हे साहस टाळायचं आहे त्यांनी कोकणवाडीतून सिन्नर-घोटी गाडीरस्ता गाठायचा. या रस्त्यावरच्या टाकेद गावात जटायूची समाधी असून गावातून एकदऱ्यामाग्रे बितनवाडीत दाखल व्हायचं. कळसूबाई रांगेत बितनगड हा छोटा किल्ला असून बितनवाडीतून किल्ल्यावर जायला सुमारे एक-दीड तास लागतो. बितनगडावरही तुरळक अवशेष, काही पाण्याची टाकी आणि एक गुहा आहे. पण कळसूबाई शिखराच्या अगदी जवळ असल्याने बितनगडावरून कळसूबाई रांगेचे भेदक दर्शन खिळवून ठेवणारं आहे.
बितनगडानंतर वेळ असल्यास भंडारदऱ्याजवळच्या गुहिरे गावातला पाबरगड पाहता येईल. हा एक कस लावणारा पण अतिशय सुंदर निसर्ग लाभलेला किल्ला आहे. डुबेरगड ते बितनगड हा पूर्व कळसूबाई रांगेतला एक नितांत सुंदर ट्रेक आहे. या संपूर्ण ट्रेकमध्ये सह्य़ाद्रीच्या रौद्र कडय़ांचे भेदक दर्शन घडते. ‘ओव्हरनाईट भटकंती’च्या या हंगामामध्ये ज्यांना सह्य़ाद्रीच्या आडवाटा साद घालतात त्यांच्यासाठी या अनगड वाटेचा प्रवास नक्कीच आनंद देणारा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2015 12:13 am

Web Title: trekking in sahyadri 2
Next Stories
1 नवी मोहीम : ‘हनुमान तिब्बा’वर ‘गिरिप्रेमी’चे पाऊल
2 रायगडाची गुढी
3 ट्रेक डायरी
Just Now!
X