एव्हरेस्टच्या वाटेवर नुकताच ‘अ‍ॅव्हलांच’मुळे एक मोठा अपघात झाला आणि यात १६ शेर्पा गिर्यारोहक मृत्युमुखी पडले. असाच एक हिमप्रपात २०१२ सालीदेखील आला होता. यंदाच्या या दुर्घटनेनंतर त्या वेळच्या या हिमप्रपाताच्या आठवणी जाग्या झाल्या.
गिर्यारोहण एक अनिश्चिततेने आणि आव्हानांनी भरलेला क्रीडाप्रकार आहे. या गिर्यारोहणात धोकेही अनेक. अतिउंचीवरील खराब होणारे हवामान, त्याबरोबर खराब होणारी तब्येत हे तर नित्याचेच. पण यातही हिमप्रपात (अ‍ॅव्हलांच), हिमभेगा (क्रिव्हास) आणि हिमनग हे गिर्यारोहणातील सर्वात मोठे धोके. यातील त्या अ‍ॅव्हलांचने नुकतेच खुंबू परिसरात मृत्यूचे ते तांडव घडवले. या घटनेने २०१२ साली आमच्या एव्हरेस्ट मोहिमेची, त्या वेळेच्या या खुंबूतील प्रवासाची, थराराची पुन्हा आठवण झाली.
‘अ‍ॅव्हलांच’ म्हणजे अतिशय वेगाने खाली येणारा बर्फ आणि दगडांचा जणू धबधबाच. वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला बेचिराख करणारा, गाडून टाकणारा. ‘अ‍ॅव्हलांच’मुळे वातावरणात तयार होणार हवेचा दाब इतका प्रचंड असू शकतो की तो एखाद्या गिर्यारोहकाला सहज हवेत भिरकावू शकतो. हिमभेगा तर गिर्यारोहकाला गिळंकृत करू पाहणाऱ्या शत्रूच असतात. या हिमभेगा कित्येक फूट खोल असतात. अशा हिमभेगात पडलेल्या गिर्यारोहकाला वाचवणे म्हणजे अशक्यच! गिर्यारोहकाचे खरे कसब पणाला लागते जेव्हा या हिमभेगा बर्फाखाली दडलेल्या असतात. हिमनगाचा धोकाही असाच. तो अचानकपणे कोणतीही चाहूल न लागू देता गिर्यारोहकांच्या अंगावर सहज चाल करून येतो. असे हे हिमप्रपात, हिमभेगा आणि हिमनगाचे भयंकर त्रिकूट आहे. गिर्यारोहकांना सतत या तीन धोक्यांपासून सावध राहावे लागते आणि हे भयानक त्रिकूट पृथ्वीतलावर जर कुठे सक्रिय असेल तर ते खुंबूमध्ये. यामुळेच खुंबू हिमनदीला मृत्यूचा सापळा असे संबोधले जाते. एव्हरेस्टच्या वाटेवर नुकतेच जे मृत्यूचे तांडव घडले ते या खुंबू भागातच! खुंबूमध्ये हिमभेगा पार करण्यासाठी शिडय़ांचा वापर केला जातो. हिमभेगेच्या दोन्ही बाजूंना दोरांच्या साहाय्याने पृष्ठभागाला समांतर अशी ही शिडी बांधली जाते. बर्फावरून चालण्यासाठी वापरले जाणारे बूट घालून अशा शिडय़ा पार करणे म्हणजे दिव्यच जणू. बुटाच्या खालच्या बाजूला लावले जाणारे खिळे शिडीमध्ये अडकून गिर्यारोहकाचा तोल जाऊ शकतो. अशा वेळेस ‘सुरक्षारक्षक दोरी’चा आधार घ्यावा लागतो. अन्यथा तोल जाऊन सरळ खोल दरीमध्ये कपाळमोक्षच. २०१२च्या आमच्या मोहिमेदरम्यान एका शेर्पाचा अशाच प्रकारे मृत्यू ओढवला होता. यानंतर त्याच्या मागून ती त्या हिमभेगेवरून जाताना रक्ताच्या थारोळय़ातील ते दृश्य पाहताना अंगाचा अक्षरश: थरकाप उडाला होता. एक क्षण असे वाटले की आपला पण तोल जाणार..! ते दृश्य आजही आठवले की अंगावर शहारा उमटतो.
अशाच एका चढाईत खुंबूच्या वर अनुभवलेल्या ‘अ‍ॅव्हलांच’चा अनुभव अजून लख्खपणे आठवतो. अगदी काल घडल्यासारखाच आहे. आम्ही ‘कॅम्प १’ वरून पुढे चाललो होतो. रिन्जी शेर्पा त्या मागे मी आणि माझ्या मागे चेतन केतकर आणि आमचा नेता उमेश झिरपे चढत होतो. इतक्यात नुप्त्से शिखराच्या दिशेने कडाडणारा आवाज आला. काही कळायच्या आत रोरावणारा ‘अ‍ॅव्हलांच’ अंगावर येताना दिसू लागला. खुंबूच्या वरती चिंचोळी जागा आणि चहूबाजूला उंचच उंच अशा पर्वतरांगा आणि एका बाजूने अंगावर  येणारा महाभयंकर ‘अ‍ॅव्हलांच’. काळजाचा ठोका चुकवणारा बाका प्रसंग. अक्षरश: मृत्यू चाल करून येत आहे असेच वाटले. काही कळायच्या आत रिन्जीने सॅक ‘अ‍ॅव्हलांच’च्या दिशेला टाकली आणि त्याच्या मागे ओणवा पडला. मीही त्याचे अनुकरण केले. आम्हाला ‘अ‍ॅव्हलांच’ने गाठले. पूर्ण आसमंतात पांढरा बर्फ. काहीच दिसत नव्हते. वारा जोरात वाहू लागला आणि त्या वाऱ्याबरोबर उडून आलेले बर्फाचे तुकडे पाठीवर जोरात आदळू लागले. काही क्षण असाच तांडव चालू राहिला. अचानक वारा थांबला. पण पांढरा रंग सोडून काहीच दिसत नव्हते. आपण गाडले गेलो आहोत याची पुरती  खात्री पटली. आपल्यावर किती बर्फ आहे हे चाचपण्यासाठी हात वर केला. सुदैवाने अ‍ॅव्हलांचच्या तडाख्यातून आम्ही वाचलो होतो आणि अतिशय दाट अशा बर्फाच्या धुक्यात आम्ही अडकलो होतो. अंगावर काही इंच बर्फाचा थर होता. तो बाजूला सारत इतर साथीदारांना पुकारा केला. आणि हळूहळू बर्फ खाली बसल्यावर सगळे सुखरूप आहेत हे कळल्यावर जीव भांडय़ात पडला. या भीषण प्रसंगानंतर पुन्हा पुढील चढाईस प्रवृत्त करण्यासाठी चांगलीच शर्थ करावी लागली.
अशा प्रसंगातून तरून जाण्यासाठी महत्त्वाचा असतो तो गिर्यारोहकाचा आत्मविश्वास आणि अनुभव! पण काही प्रसंगांत तुमचे निसर्गापुढे काहीच चालत नाही. खुंबू परिसरात नुकत्याच घडलेल्या त्या घटनेने या आठवणी जाग्या झाल्या आणि अंगावर शहारे आले.
..गिर्यारोहण सतत अनिश्चिततेने भरलेले असते. जीवन-मृत्यूच्या रेषेवरचा हा खेळ साहसाबरोबरच निसर्गाची शक्ती आणि त्यातून जगण्याचे मोल शिकवून जातो.