पवन मावळात शिवशाहीमध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या दुर्गचौकडींची मोठी दहशत होती.
या चौकडीतीलच आपल्या विशिष्ट आकाराने सहज ओळखता येणारा असा तिकोना किल्ला! पावसाळा सुरू झाल्यावर या साऱ्या मुलखालाच नवी झळाळी येते.  मावळातल्या डोंगरवाटांवर पाय उमटवायला आणि सगळा पवन मावळ मनात साठवायला हाच उत्तम काळ!
पवन मावळ! बारा मावळांपैकी एक. लोणावळय़ाच्या दक्षिणेकडे सहय़ाद्रीत उगम पावणाऱ्या पवना नदीचे हे खोरे. या नदीवर १९७५ मध्ये पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय साकारला. अशा या पवन मावळात शिवशाहीमध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या दुर्गचौकडींची मोठी दहशत होती. या चौकडीतीलच आपल्या विशिष्ट आकाराने सहज ओळखता येणारा असा तिकोना किल्ला!
पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतपासून पंधरा किलोमीटरवर पवना धरण. या धरणालगतच्या पवनानगर, काळे कॉलनी भागापर्यंत तळेगाव, कामशेतहून एस.टी. बस येतात. इथून चार ते पाच किलोमीटरच्या चालीवर तिकोना गड आहे. दक्षिणेकडून पौड- कोळवण-काशिग मार्गेही गडापर्यंत एक रस्ता येतो. यासाठी पुण्याच्या स्वारगेटहून सुटणारी जवण, काशिगची बस सोयीची. याशिवाय कामशेत, तळेगावहूनही जवणच्या दिशेने देखील काही एसटी बस धावतात. यापैकी कुठलीही बस मिळाल्यास गडाच्या पायथ्याशी असलेल्या घेवंड गावी उतरत तिकोना जवळ करता येतो.  
समुद्रसपाटीपासून ३४८० फूट (९९३ मीटर) उंचीवर असलेल्या या गडाचा माथा त्रिकोणी आकाराचा असल्याने याचे नाव तिकोना! याला ‘वितंडगड’ असेही दुसरे नाव आहे, पण ते कानाला तितकेसे गोड वाटत नाही.
काळे कॉलनी मार्गे गडाकडे येऊ लागलो, की तिकोन्याचा हा त्रिकोणी आकारच प्रथम लक्ष वेधून घेतो. त्याचे ते आकाशाला खेटलेले कातळी रूप पाहून नवख्यांच्या मनात शंकेची पालही चुकचुकून जाते. पण शेतीवाडीतून, भाताच्या खाचरांतून निसर्गाशी नाते जोडत पायथ्याच्या तिकोना पेठेत येईपर्यंत गडाशी असलेले मैत्र घट्ट होते आणि मग हे आव्हानही सोपे वाटू लागते.
तिकोना पेठ! बहुतेक गडांना इतिहासकाळापासून असणारी अशी ही गडाची बाजारपेठ! आज मात्र इथे डोंगरउतारावरील चार घरांची वस्ती आहे. इथून गडाचा दगड ना दगड स्पष्ट दिसतो. या गडावर जाण्यासाठी काशिग, घेवंड आणि पायथ्याच्या तिकोना पेठ या तीन वस्त्यांमधून वाट आहे. यापैकी कुठल्याही वाटेने आलो तरी प्रथम गडाच्या माचीत दाखल होतो. तिकोना पेठेतून गडावर दोन वाटा चढतात. एक सरळ उभ्या चढणीची, तर दुसरी लांबची, गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपी. पहिल्या वाटेने वर आलो तर गडाच्या पहिल्या ‘पालथा दरवाजा’तून माचीवर प्रवेश होतो. तर दुसऱ्या वाटेने आपण खिंडीजवळून माचीत दाखल होतो. काशिगकडून येणारी वाटही इथेच येऊन मिळते. याशिवाय घेवंड मार्गे येणारी वाट वेताळ दरवाजातून माचीत दाखल होते.
माचीवर दाखल होताच मारुतीची एक भलीमोठी मूर्ती आपली वाट अडवते. महाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या परिसरात विशेषत: प्रवेशमार्गावर हनुमानाच्या मूर्ती हमखास दिसतात. मारुती ही शक्तीची, शत्रूचा नाश करणारी देवता. तेव्हा अशा लढाईच्या मैदानी तिची स्थापना होणे हे अत्यंत स्वाभाविक!
पुढे आले, की उभ्या कडय़ातील एक प्राचीन लेणे खुणावते. तळजाई मंदिर म्हणून स्थानिक लोकांच्यात हे लेणे परिचयाचे आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. यापुढील छतावर कमळाची सुरेख शिल्पाकृती कोरली आहे. या लेण्यासमोर एक तळेही खोदलेले आहे.
पुण्याच्या डेक्कन कॉलजेच्या डॉ. शोभना गोखले, डॉ. एच. डी. सांकलिया आणि प्रभाकर कुलकर्णी यांनी या लेण्याचे संशोधन करताना त्याचा सातवाहनोत्तर असा काळ निश्चित केला. त्या वेळी त्यांना या परिसरात सातवाहनकालीन जात्याची एक तळीही मिळाली होती. म्हणजे हे खोदकामही प्राचीन असणार. पुढे यामध्ये कालपरत्वे काही बदलही झाले. या गडाच्या पुढय़ातच बेडसे लेणीचा डोंगर आहे. बेडसे लेणी खूपच प्राचीन. बहुधा यातूनच इथल्या या खोदकामाने प्रेरणा घेतलेली असावी.
या लेण्याच्या समोर पूर्वी एक सतीशिळा होती. तिच्यावरचे शिल्पांकन फारच आगळे होते. दोन थरांत कोरलेल्या या शिल्पपटात वरच्या भागात एका पुरुषाच्या पायाखाली एक महिला दाखवली होती. तर खालच्या भागात हाती पुष्पमाला घेतलेल्या दोन महिला कोरल्या होत्या. पण याचा अर्थ लावण्यापूर्वीच ही सतीशिळा इथून गायब झाली. या अशा जागोजागीच्या शिल्पांची तातडीने नोंद करत त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे.
हे लेणे पाहात तिकोन्याच्या बालेकिल्ल्याकडे निघावे. वाटेवरच त्या काळी बांधकामासाठी वापरली जाणारी चुन्याची घाणी, काही घरांचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या पन्नास पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. आत प्रवेश करताच उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके दिसते. याचे पाणी म्हणजे ‘अमृताहुनी गोड’! महाराष्ट्राएवढे गड अन्यत्र कुठेही नाहीत. पण या प्रत्येक गडावरच्या पाण्याची चव निराळी. शास्त्रीय भाषेत जरी सगळीकडचे पाणी ‘एचटूओ’ असले तरी गडकोटांवरच्या या अशा अमृतमय पाण्यासाठी काही खास संज्ञाच तयार करावी लागेल.
बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्यापर्यंतची वाट अक्षरश: उभा कातळ फोडून तयार केली आहे. दहा ते पंधरा फूट उंची-खोलीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते. अरुंद वाट, उंच पायऱ्या आणि भोवतीने अंगावर येणाऱ्या उभ्या कातळभिंती..हे खोदकाम मनावरील दडपण वाढवत जाते. हे करणाऱ्या, खोदणाऱ्या त्या गडपतीलाही हेच अपेक्षित! त्या अरुंद वाटेवरून या बालेकिल्ल्यात एका वेळी एकच जण शिरावा, त्या उंच पायऱ्यांवरून चढतानाच त्याचा जीव मेटाकुटीला यावा आणि मग असा हा थकलेला शत्रू सहज हाती यावा. इतिहासातील किल्ल्यांचे लढाऊ सामथ्र्य हे त्याच्या अशा छोटय़ा छोटय़ा जागांमधून प्रगट होत असते.
बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा प्रशस्त, आखीवरेखीव. दरवाजासमोरच अर्धवर्तुळाकार बुरूज बांधून तो अधिक सुरक्षित केला आहे. या बुरुजाला आतील बाजूस बसण्यासाठी एक ओटाही बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतही उजव्या हातास पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत. तर डावीकडे ढालकाठीचा बुरूज आहे. यानंतर दुरवस्थेतील तिसरा दरवाजा येतो. याला ओलांडतच आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.
तिकोन्याचा बालेकिल्ला खूपच छोटा. ऐन माथ्यावरचे छोटेखानी त्र्यंबकेश्वराचे मंदिर, एक मोठा तलाव, दोन-चार खोदीव टाक्या, धान्याची कोठारे असे थोडेफार अवशेष व दगडविटांचे ढिगारे इथे दिसतात. पण गडांवर प्रेम करणाऱ्यांना यातही खूप काही इतिहास दिसू लागतो.
तिकोना गड त्याच्या इतिहासाबद्दल फारसा बोलत नाही. या परिसरात फार मोठी लढाईदेखील झाली नाही. पण तरीही इतिहासात पवन मावळातील एक मुख्य चौकी म्हणून तिकोना गडाचे महत्त्व मोठे होते. या गडाच्या पोटातील लेण्यावरून त्याचे अस्तित्वही प्राचीन असावे. बहमनी काळापासून या गडाचे इतिहासातील उल्लेख मिळतात. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्याच्या घोडदौडीत सुरुवातीला जे किल्ले घेतले त्यामध्ये तिकोनाही होता. या वेळीच राजांनी अन्य गडांबरोबर याचेही नाव बदलून ‘वितंडगड’ असे ठेवले. पुढे पुरंदरच्या तहात तिकोना मुघलांच्या ताब्यात गेला. पण काही दिवसांतच मराठय़ांनी तो पुन्हा मिळवलादेखील. यानंतर औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीवेळीही मुघलांनी तिकोन्याभोवती पुन्हा पाश टाकले. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले ‘अमनगड’! पण अमनगडाचा हा प्रवासही अल्पकाळचाच ठरला..मराठय़ांनी गड पुन्हा जिंकला. मराठय़ांची ही सत्ता पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत अबाधित राहिली. या लढाईत कर्नल प्रॉथरने हा गड जिंकला, पण तो पुढे पुन्हा भोर संस्थानकडे सोपवल्याने एकप्रकारे तिकोन्यावरचा जरीपटका अबाधितच राहिला. या संस्थान काळातच असणारे तिकोन्याचे शेवटचे किल्लेदार शिंदे सरनाईक यांचा वाडा आजही गडाच्या दक्षिण पायथ्याशी काशिग गावात आहे.
तिकोन्याचे हे दुर्गदर्शन आटोपले, की आपले लक्ष जाते ते आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांवर. गडाच्या माथ्यावरून सारा पवन मावळ नजरेत भरतो. पवनेचा विशाल जलाशय तर नजर विस्फारतो. एकेकाळी या मावळावर दहशत गाजविणारे तुंग, लोहगड, विसापूर हे दुर्ग त्यांच्या माना वर काढतात. यातला पवनेच्या जलाशयात मधोमध विसावलेला तुंगचा उत्तुंग किल्ला तर एखाद्या पुराणपुरुषाप्रमाणे भासतो. तुंगमागचा खोटा तुंगी, घुसळखांबचा तो मनोऱ्यासारखा डोंगर, दूरवरचा कोरीगड, इकडे समोर बेडसे लेणी, भातराशीचा डोंगर असे सारे सहय़ाद्रीचे शिलेदार आपल्याला खुणावू लागतात. पावसाळा सुरू झाल्यावर तर या साऱ्या मुलखालाच एक नवी झळाळी येते. हिरवे डोंगर, ओल्या भातखाचरांनी सगळा पवन मावळ नटून जातो. या हिरवाईतून लाल कौलांच्या वाडय़ावस्त्या उठून दिसतात. मग निसर्गाच्या या रंगपंचमीत लाल-गढूळ रंग लेवून पवनेचे पात्रही धावू लागते. मावळातल्या डोंगरवाटांवर पाय उमटवायला आणि सगळा पवन मावळ मनात साठवायला हाच उत्तम काळ! चला तर मग..!

Washim, Vehicle accident,
वाशिम : लग्नसमारंभासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन ठार
pune, woman s husband, Husband Sets Fire to 15 Bikes, Fire to 15 Bikes, Teach Mother in Law a Lesson, mother in law, husband wife dispute, husband mother in law dispute, crime news, fire brigade, bikes fire, fire news, marathi news,
धक्कादायक : पत्नी, सासूला धडा शिकवण्यासाठी १५ दुचाकी जाळल्या
Girl brutally killed by boyfriend in Mankhurd
मानखुर्दमधील तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या, स्थानिकांमध्ये संताप
Rainy Weather, unseasonal rain, Delights Wildlife, Tadoba Andhari Tiger Project, Bears Spotted Carrying Cubs, Bears Spotted Carrying Cubs on Their Backs, marathi news, tadoba news, andhari news, viral video,
VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….