एका व्यक्तीचे नाव सर्च केल्यावर चुकीची माहिती देणाऱ्या गुगल या जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनला दंड ठोठावण्यात आला आहे. या व्यक्तीने गुगलविरोधात केवळ खटला दाखल केला नाही तर तो जिंकलाही. त्यामुळे आता गुगलला या व्यक्तीला १,५०,००० डॉलर भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील. त्याचे झाले असे की २००४मध्ये या ठिकाणी राहणाऱ्या मिलोराड त्रिकुजला या व्यक्तीने गुगलवर आपले नाव टाकले तर त्याचा फोटो आणि नाव एक गँगस्टर म्हणून दाखवले जात होते.

आपल्या नावापुढे येणारे हे स्पष्टीकरण पाहून हा व्यक्ती सुरुवातीला काहीसा हादरला. प्रत्यक्षात मेलबर्न येथील एका स्थानिक गँगस्टरने त्याच्यावर काही दिवस आधी हल्ला केला होता. या घटनेनंतर त्याने गुगलच्या विरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे कित्येक वर्ष चाललेला हा खटला तो लढत राहीला आणि अखेर यश मिळवत दंडाची रक्कम मिळाली. व्हिक्टोरिया कोर्टमध्ये केल्या गेलेल्या या खटल्यामध्ये गुगल चुकीचे सर्च करत असल्याची तक्रार दाखल केली. त्यावेळी गुगलला यश मिळाले. मात्र मिलोराडने हार न मानता उच्च न्यायालयात खटला दाखल केला.