घर, दुकान, बंगला आणि फ्लॅट विक्रीला काढणे हे सर्वसाधारण आहे. पण एखादे गाव विकायला काढल्याचे तुम्ही कधी ऐकलत का? हो न्यूझीलंडमधील एक सुंदर आणि निसर्गरम्य असलेले एक गाव सरकारने विकायला काढले आहे. लेक वेटकी या गावामध्ये असणारी आठ घरे रिकामीच आहेत. याशिवाय गावात एक हॉटेल, एल लॉज आणि ९ गॅरेज आहेत. या गावाची अनेकवेळा विक्री झाली आहे. १९९१ मध्ये एका खासगी फर्मला हे गाव विकले होते. तेथे रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, न्यूझीलंडमधील दक्षिण बेटावर असलेले रमणीय लेक वेटकी हे गाव सरकारने विक्रीसाठी काढले आहे. याची किंमत २८ लाख डॉलर आहे. एकेकाळी धरणाच्या कामामुळे हे गाव गजबजलेले होते. मात्र धरण बांधून झाल्यानंतर येथील लोकांचा रोजगार संपला. त्यामुळे त्यांनी अन्य शहरांकडे मोर्चा वळवला.

गावाच्या विकासासाठी सरकारने कोट्यवधी रूपये देण्याची घोषणा केली. मात्र तरीही या गावाकडे कोणीही फिरकले नाही. न्यूझीलंड सोडता इतर देशातील लोकांना हे गाव खरेदी करता येणार नाही. कारण, विदेशी नागरिकांना खरेदी न करता येण्याचा नियम आहे. विदेशी खरेदीदार हे गाव खरेदी करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत, मात्र नियमाच्या आडकाठीमुळे त्यांना यामध्ये अद्याप यश आलेलं नाही. हे गाव खरेदी करण्याच्या प्रयत्नात चीनमधील लोक आघाडीवर आहेत.