लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर आल्याने पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मंगळवारी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील सैन्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तातडीने बैठक बोलावली होती. यादरम्यान सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमारेषेवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावासाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवताना दिसत आहेत.

मोदी व्हिडीओत काय बोलत आहेत –
“प्रत्येक दिवशी आपण संकटाने घेरले जात आहोत. पाकिस्तान आपलं वागणं सोडत नाही आहे. चीन डोळे दाखवत आपल्या जमिनीवर घुसखोरी करत आहे. इतकंच नाही तर ब्रम्हपुत्रा नदीचं पाणी अडवण्याचा, अरुणाचल प्रदेश हडपण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या बंधू भगिनींनो हे सगळं लष्कर दुर्बळ असल्याने होत आहे का ? हे शेजारचे देश आपल्याला त्रास देत आहेत ते लष्कर दुर्बळ असल्याने आहे का ? मित्रांनो समस्या सीमेवर नाही तर दिल्लीत आहे,” असं सांगत नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी तत्कालीन युपीए सरकारवर टीका केली होती.

हा व्हिडीओ १५ सप्टेंबर २०१३ रोजीचा आहे. त्यावेळी दोन दिवसांपूर्वीच भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. हरियाणामध्ये झालेल्या या प्रचारसभेत नरेंद्र मोदी सीमेवर असलेल्या समस्येवर बोलताना युपीए सरकारला सत्तेतून खाली आणण्याचं आवाहन केलं होतं.