कोणाचा नशीब कधी आणि कसा चमकेल काही सांगता येत नाही. असाच काहीसं घडलं आहे चार भिकाऱ्यासोबत. भीक म्हणून दिलेल्या लॉटरीच्या तिकिटामुळे चारही भिकारी मालामाल झाले आहेत. फ्रेंच लॉटरी संचालक एफडीजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जुगाऱ्याने भिकाऱ्यांना भीकमध्ये लॉटरीचं तिकीट दिलं आणि भिकाऱ्यांचं नशीब फळफळलं आहे. हे चारही भिकारी लखपती झाले आहेत.

लोकांना भीक मागून पोट भरणाऱ्या भिकाऱ्यांना मिळालेल्या या लाभामुळे आनंद झाला आहे. या पैशातून त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय होणार आहे. लॉटरीच्या तिकिटामुळे बेघर असणाऱ्या चार भिकाऱ्यांना छत मिळालं आहे. शिवाय त्यांच्या खाण्याची सोयही होणार आहे. FDJ ने सांगितले की, या चौघांनी जॅकपॉट वाटून घेतला आहे. इतकी मोठी रक्कम मिळाल्यामुळे त्यांना आता भीक मागण्याची गरज नाही, तर ते आपल्या आलिशान घराचं स्वप्न पूर्ण करू शकतात.

फ्रेंच लॉटरी संचालक एफडीजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार भिकाऱ्यांना ५० हजार यूरोची ( म्हणजेच ४३ लाख रुपयांहून जास्त) लॉटरी लागली आहे. चारही भिकाऱ्यांचं वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे. हे चारही जण ब्रेस्टच्या वेस्टर्न पोर्ट सिटीच्या एका लॉटरी शॉपच्या बाहेर भीक मागत होते. एका व्यक्तीने एक युरोचं तिकीट घेतलं आणि ते भीकमध्ये दिलं. या भिकाऱ्यांना पाच युरो नाही तर ५०,००० युरो मिळाल्याचं समजलं तेव्हा लॉटरीचं तिकिट देणारा हैराण झाला.