संपूर्ण जगभरात सध्या करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आलेलं असून या काळात सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद आहेत. सर्व खेळाडू या काळात आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर गेल्या काही दिवसांमध्ये टिकटॉकवर भारतीय सिनेमांमधली गाणी, डायलॉगवर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे वॉर्नरसोबत त्याची पत्नी व त्याच्या मुलीही यात सहभागी होतात. वॉर्नरने नुकताच बाहुबली सिनेमातला संवादावर एक व्हिडीओ बनवत टिकटॉकवर अपलोड केला आहे.

याआधीही वॉर्नरने तेलगू सिनेमातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ अपलोड केला होता. वॉर्नच्या या प्रयत्नांना सोशल मीडियावर नेटकरी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियन सरकारने लॉकडाउन घोषित केलेलं असल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल २८ मे ला आयसीसी बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड आर्थिक संकटात आहे. त्यात वर्षाअखेरीस भारताचा प्रस्तावित दौरा रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार भारतीय संघाला प्रवासाची विशेष परवानगी देण्याचा विचार करत असल्याचंही समजतंय.