प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध विषयांना हात घालणारे व्हिडिओ किंवा फोटो ट्विट करुन त्यावर ते आपली प्रतिक्रिया किंवा विचार मांडत असतात. आता त्यांनी कचरा वेचणाऱ्या दोन भावांचा व्हिडिओ शेअर केला आहे, दोन्ही भावांचं गाणं ऐकून महिंद्रा चांगलेच प्रभावित झाले असून दोघांनाही योग्य संगीत प्रशिक्षण देणार असल्याचं त्यांनी जाहिर केलंय.

आनंद महिंद्रा यांच्या रोहित खट्टर नावाच्या मित्राने कचरा वेचणाऱ्या भावंडांची एक पोस्ट महिंद्रांसोबत शेअर केली होती. त्यानंतर ‘इनक्रेडिबल इंडिया’, असं म्हणत ट्विटरद्वारे महिंद्रा यांनी त्या भावंडाचा व्हिडिओ शेअर केला. “दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये हाफिज आणि हबीबूर हे दोन भाऊ कचरा उचलण्याचं काम करतात. प्रतिभा कोणामध्येही असू शकते, त्याला काही मर्यादा नसते हे स्पष्ट झालं”, असं महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये, “दोघंही प्रतिभावान आहेत, यात काही शंका नाही. मी आणि रोहित त्यांना संगीत प्रशिक्षणासाठी मदत करु इच्छितो. दोघं दिवसभऱ काम करतात, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत दोघांना संगीत प्रशिक्षण देऊ शकेल अशा दिल्लीतील एखाद्या संगीत शिक्षकाची कोणी माहिती देऊ शकेल का?” अशी विचारणा महिंद्रांनी आपल्या फॉलोअर्सकडे केली आहे.


महिंद्रांच्या या कामाचं नेटकरी कौतुक करत असून खऱ्या प्रतिभेला संधी मिळायला हवी अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.