लग्नाच्या वेळी कधी काय गोंधळ होईल आणि काय करावे लागेल सांगता येत नाही. लग्नादरम्यान घडणाऱ्या या गमतीजमती नंतर कित्येक दिवस गाजतात. नुकतीच अशीच एका लग्नाची गोष्ट विशेष गाजत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. लग्नाला येताना वाहतूक कोंडीत अडकल्याने एका नवरदेवाने गाडीतून उतरुन रस्त्याने चालत मंगल कार्यालयात येण्याचा निर्णय घेतला. लग्नघटीका जवळ आल्याने मुहूर्त टळू नये म्हणून या नवरदेवाने कोणतेही मानपान न ठेवता थेट चालत जाण्याचे ठरवले. विशेष म्हणजे त्यामुळे हा नवरदेव लग्नाला वेळेत पोहोचला आणि मुहूर्तही साधला.

जगात कुठेही होत असलेली वाहतूक कोंडी ही आपल्याला नवीन नाही. पण त्यामुळे कोणाल कशाप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल सांगता येत नाही. ही घटना आहे रायगडमधील्या पेण गावातील. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक संथगतीने सुरु होती. मात्र लग्नाची वेळ जवळ आल्याने वेळ टळून जाऊ नये यासाठी नवरदेवाची घालमेल सुरु होती. अखेर यावर मार्ग काढण्यासाठी त्याने गाडीतून उतरत चालत जाण्याचे ठरवले. मग तो आणि त्याच्यासोबत गाडीत असणारी वऱ्हाडी मंडळीही महामार्गावरुन चालत लग्नाच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी नवरदेवाला ऊन लागू नये म्हणून नातेवाईकांनी त्याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे दिसत आहे. हे सगळे असले तरीही आपल्याच लग्नाला अशाप्रकारे पायपीट करत जाणारा नवरदेव तुम्ही याआधी नक्कीच पाहिला नसेल.