महिलांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामासह स्वयंपाक काय करायचा याचे टेन्शन असते. मदतीला कोणी असेल तर ठीक, नाही तर सकाळी पाणी गरम करण्यापासून चहा, नाश्ता, स्वयंपाक एकटीलाच करावा लागतो. एखादवेळी अशी परिस्थिती येते की, अचानक कोणी तरी जेवणासाठी म्हणून घरी येतात. अशावेळी काय करावे सूचत नाही किंवा जी मुलं हॉस्टेलवर राहतात, त्यांनाही काही वेळा रोज जेवण काय बनवायचे असा प्रश्न पडतो. यात त्यांच्याकडे भांडी फार कमी असतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक दाखवणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी काही मिनिटांत एका कुकरमध्ये भात, वरण, भाजी अशा सर्व गोष्टी एकाचवेळी बनवू शकता, कसे ते पाहा.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला एकाच कुकरमध्ये एकाच वेळी तीन वेगवेगळे पदार्थ बनवत आहे. तुम्ही पाहू शकता की, ती महिला एका कुकरमध्ये आधी डाळीला फोडणी देते आणि थोडे पाणी टाकून डाळ शिजण्यासाठी ठेवते. यानंतर तांदूळ धुवून एका तांब्यात ओतते आणि त्यात पाणी ठेवून तो कुकरमध्ये ठेवते. एवढेच नाही तर कुकरमध्ये एक बटाटा उकडण्यासाठी ठेवला. यानंतर तिने कुकर बंद केला आणि शिट्ट्या होऊ दिल्या. कुकरच्या १० मिनिटांत तीन शिट्टी होतात तेव्हा ती गॅस बंद करते आणि कुकर थंड झाल्यावर त्यातून तयार भात, उकडलेला बटाटा बाहेर काढते; तर कुकरच्या तळाशी डाळही शिजलेली असते. यानंतर ती उकडलेल्या बटाट्यापासून चटणी तयार करते. चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लाल मसाला घालून एका भांड्यात चटणी तयार करते. अशाप्रकारे ती एकाच वेळी तीन वेगवेगळे पदार्थ अगदी १० मिनिटांत एकाच कुकरमध्ये बनवते.

हा व्हिडीओ एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) @ChapraZila नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘विद्यार्थी जीवनात १० मिनिटांत जेवण शिजवण्याची सोप्पी ट्रिक.’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने गमतीने विचारले की, तुम्ही पीठपण ठेवू शकता का? आणखी एका युजरने लिहिले, ताई आम्ही १२ वर्षांपासून असेच स्वयंपाक करून खात आहोत. तिसऱ्या युजरने लिहिले की, संघर्षाचे हे दिवस आम्हाला चांगला अनुभव देतात.