रशियातल्या अल्ताई प्रदेशामध्ये शून्याखाली २१ अंश तापमानात दोन वर्षांच्या एका मुलाचा जीव एका कुत्र्याने वाचवल्याने त्याला आता त्या परिसरात ‘हीरो डाॅग’ म्हणण्यात येत आहे.

लहान मुलांची आपण किती काळजी घेतो. त्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी त्यांचे आईवडील त्या मुलासाठी सगळं काही करतात. पण या मुलाला त्याच्या घराच्या आवारात त्याच्या आईने दोन दिवसांसाठी एकटंच सोडून दिलं होतं. त्याची आई त्याच्यासोबत नव्हती आणि रशियातल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत हा मुलगा उघड्यावर राहिला होता. त्यावेळी या कुत्र्याने त्याच्याजवळ राहत थंडीपासून त्याचं रक्षण केलं.

घराच्या या आवारात हा मुलगा दोन दिवस उघड्यावर होता (छाया सौजन्य- सैबेरियन टाईम्स)
घराच्या या आवारात हा मुलगा दोन दिवस उघड्यावर होता (छाया सौजन्य- सैबेरियन टाईम्स)

 

या दोन दिवसांमध्ये इथलं तापमान १२ अंश सेल्सियस ते वजा २१ अंश सेल्सियस या रेंजमध्ये होतं. अशा प्रकारच्या तापमानात उघड्यावर राहिलं तर एखाद्या धडधाकट माणसाचाही मृत्यू होईल. तिथे या दोन वर्षांच्या मुलाचं जिवंत राहणं जवजवळ अशक्य होतं. पण या कुत्र्याने या मुलाचं थंडीपासून संरक्षण केल्याने तो बचावला.

दोन दिवसांनी हा मुलगा असा उघड्यावर असल्याचं त्याच्या शेजाऱ्यांना कळलं तेव्हा त्याना धक्का बसला. त्यांनी या मुलाला तातडीने त्यांच्या घरात आणलं आणि डाॅक्टरांकडे नेलं. तिथे त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. भयानक थंडीमुळे या मुलाला ‘हायपोथर्मिया’ झाल्याचं आढळलंय पण तो आता उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं जातंय.

पाहा व्हिडिओ – काहीही कर पण तू गाऊ नको!!

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या मुलाला त्याच्या आईने जाणूनबुजून घराबाहेर टाकून पोबारा केल्याचा आरोप होतोय. या कुटुंबाच्या शेजाऱ्यांना हा मुलगा सापडल्यानंतरही चार दिवस उलटल्यावर त्याची आई तिच्या घऱी परत आली. यासंदर्भात तिच्यावर खटला भरण्यात आला आहे.

शेवटी माणसाला कळली नाही ती भावना मुक्या प्राण्यालाच कळली.