दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पर पडला. यंदाचे मेळाव्याचे ५४ वे वर्ष होते. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख यांनी अनेक घोषणा केल्या. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नवे गाणेही प्रकाशित करण्यात आले. मात्र या गाण्याची रचना ही शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९८ साली झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये भारताला हिंदुस्तान म्हणण्याची सूचना सर्वांना केली होती. मात्र शिवसेनेच्याच नव्या गाण्यामध्ये देशाचा उल्लेख हा हिंदुस्तानऐवजी भारत असा करण्यात आला आहे. त्यामुळेच या गाण्यातील भारत या शब्दावरुन शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुकींच्या तारखा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच शिवसेनेने दसरा मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका करण्याबरोबरच अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊसच आपल्या भाषणातून पडला. दरम्यान त्याआधी या मंचावरुन शिवसेनेचे नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने ‘हिच ती वेळ’ म्हणत आदित्य यांचे होर्डींग लावले होते. याच ‘हिच ती वेळ’ संकल्पनेवर आधारित ‘हिच ती वेळ… हात तो क्षण… विकासासाठी तन-मन-धन’ हे नवे शिवसेना गीत संगीतकार अवधुत गुप्ते आणि गायक स्वप्नील बांदोडकर यांनी तयार केले आहे. या गाण्यामध्ये देशाचा उल्लेख हा शिवसेना करते त्यापद्धतीने हिंदुस्तान असा न करता भारत असा करण्यात आला आहे. ‘जगात भारत एक नंबर आणि भारतात महाराष्ट्र करु..’ असे शब्द या गाण्यामध्ये आहेत.

मात्र आता या नवीन शिवसेना गितामुळे पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या आदेशाला पक्षाने बगल दिल्याचे चित्र दिसत आहे. बाळासाहेबांनी १९९८ साली पार पडलेल्या दसऱ्या मेळाव्यामध्ये ‘देशाला भारत नाही तर हिंदुस्तान म्हणायचे’ असं शिवसैनिकांना सांगितलं होतं. ‘आजपासून या देशाला भारत म्हणून नका इंडिया म्हणू नका फक्त हिंदूस्तान म्हणा. जेवढे जमलेले आहेत तेवढ्या कडव हिंदूंनी आजपासून देशाला हिंदुस्तान म्हणायचं भारत बिरत म्हणायचं नाही. भारताला माझा विरोध नाही. भारमाता की ठीक आहे. पण आमच्या कट्टर हिंदुत्ववादाचा ठसा उमटलाच पाहिजे. कट्टर हिंदुत्ववादाचा प्रचार करताना हे तुम्ही दाखवून द्या की होय आम्ही हिंदुस्तानामध्ये राहणारे हिंदू आहोत,’ असं वक्तव्य बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये केलं होतं. पण आता थेट शिवसेनेलाच बाळासाहेबांच्या या शब्दांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगू लागली आहे. तुम्हीच पाहा काय म्हणाले होते बाळासाहेब…

दरम्यान, शिवसेनेने देशाचा उल्लेख हिंदुस्तानऐवजी भारत असा केला असला तरी तो नियोजनाचा एक भाग असल्याचीही चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांच्या युवा नेतृत्वाखाली पक्षाने सर्वसमावेशक भूमिका घेण्याचे ठरवले असल्याचे समजते. याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरेंची उमेदवारी वरळीमधून जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये गुजराती, तमीळ, इंग्रजी भाषेमध्ये ‘कसं काय वरळी’ असे होर्डींग्स लावण्यात आले होते.