Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गुलाबी साडी या मराठमोळ्या गाण्यानेही सोशल मीडियावर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज मराठी, बॉलीवूड कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून प्रत्येक जण या डान्सचं कौतुक करताना दिसत आहे.

महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला वेळ काढून आवडीच्या गाण्यावर एखादी रील बनविताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत; ज्या गुलाबी साडी या गाण्यावर रील डान्स करीत आहेत.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चार महिलांनी गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली असून, त्यांनी नाकात नथ, हिरव्या बांगड्या, गळ्यात हार आणि केसांत गजरा माळला आहे. या मराठमोळ्या लूकमध्ये तयार होऊन या चौघी गुलाबी साडी या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्या एकदम साध्या, सोप्या आणि सुंदर पद्धतीनं डान्स करीत आहेत. त्यांच्या साधेपणाचं सोशल मीडियावर युजर्स खूप कौतुक करीत आहेत.

हेही वाचा: एकीचे बळ! म्हशीवर हल्ला करताच संपूर्ण कळपाने सिंहाच्या शावकांना घेरले… पुढे असे काही घडले की…Viral Video पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील @nath_and_heels या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि एक हजारहून अधिक लोकांच्या लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “इतका साधेपणा, सोज्वळ आणि संस्कृती जपून नाचताना पाहून खरंच मीपण नाचायला लागलो इथे, खूप सुंदर.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “तुम्ही चौघीपण खूप सुंदर दिसत आहात.” आणखी एकानंही त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, यापूर्वीही या लोकप्रिय गाण्यावर अनेकांनी डान्स केला आहे. सोशल मीडिया सेलिब्रिटी किली पॉलनंही या गाण्यावर डान्स केला होता.