फेसबुकने आपला लोगो बदलला आहे. व्हाट्स अ‍ॅप, इंस्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया अ‍ॅप पेक्षा स्वतःला वेगळे दर्शवण्यासाठी असं करण्यात आलं आहे. फेसबुक शिवाय ट्विटर आणि लिंक्डइन सारख्या अन्य सोशल मीडिया अ‍ॅप्सचा रंग देखील जवळपास सारखाच आहे. निळा हा त्यांचा मुळ रंग आहे. मात्र, निळ्या रंगाचीच का निवड केल्या गेली? या मागे खास कारण आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी निळ्या रंगाच्या निवडीमागचे कारण सांगितले आहे. त्यांनी स्वतः असे सांगितले होते की, त्यांना रंग आंधळेपणा आहे. म्हणजेच त्यांना काही रंगांमधील फरक ओळखता येत नाही. झुकरबर्ग यांना लाल आणि हिरवा या रंगातील फरक ओळखण्यास अडचण येते. मात्र, निळा रंग त्यांना स्पष्टपणे ओळखता येतो. हेच कारण आहे की, फेसबुकची प्रत्येक गोष्ट ही निळ्या रंगाच्या छटेत आहे.

ट्विटर आणि लिंक्डइनची निर्मिती झुकरबर्ग यांनी केलेली नाही, मात्र तरी देखील या सोशल मीडिया अ‍ॅप्सचा रंग निळा आहे. हा केवळ योगायोग समजावा की, जाणूनबुजून असे करण्यात आले आहे? रंगांचा आपल्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो? तुम्हाला एखादा रंग का आवडतो किंवा एखाद्या रंगाचा आपल्याला राग का येतो? याचा विचार आपण केला आहे का?

जगातील सर्वात मोठ्या तीन सोशल मीडिया अ‍ॅप्सचा निळा रंग असण्यामागे केवळ योगायोग नाही. या रंगामागे ब्रॅण्डिंगचे नियोजन व युजर्सच्या वर्तणुकीचे मानसशास्त्र काम करते. निळा रंग हा बुद्धिमत्तेचा रंग असल्याचे मानले जाते. सोशल मीडिया संदेशांची देवाणघेवाण करण्याचे उत्तम माध्यम आहे.

याशिवाय निळ्या रंगाबाबत असे देखील मानले जाते की, विश्वास, अवलंबित्व आणि विश्वासार्हतेचा हा रंग आहे. आपल्या व्यवसायात या रंगाचा वापर करणारे हाच संदेश ग्राहकांपर्यंत पोहचवू इच्छितात. एका सर्वेक्षणानुसार निळा रंग जगातील सर्वात आवडता रंग आहे. आपण जर सोशल मीडियावरील रंगसंगतींवर नजर टाकली, तर आपल्याला हे प्रकर्षाने जाणवते की, निळ्या रंगाबरोबच पांढरा रंग देखील मोठ्याप्रमाणावर वापरला जातो. निळ्याबरोबर पांढरा रंग स्पष्टता, सहजता आणि दक्षता दर्शवतो. अशाप्रकारे निळा व पांढरा रंग एकमेकांना पूरक असल्याप्राणे वापरले जाऊ शकतात.

फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइन शिवाय निळा रंग वापरून, आपली ब्रॅण्डिंग करणाऱ्यांमध्ये वर्डप्रेस, स्टबलअ‍ॅपऑन, टम्बलर आणि रेडिटचा समावेश आहे.