लष्करी अधिकारांच्या पत्नीचं जीवन काय असतं, हे अनेकदा आपल्याला ठावूकही नसतं. दहशतवादी हल्ल्यात किंवा सीमेवर लष्करातला अधिकारी मारला की आपण तेवढ्यापुरता दु:ख आणि राग अशा भावना व्यक्त करतो. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कुटुंब कसं जगत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एका शहिद अधिकाऱ्यांच्या पत्नीनं या प्रवासातला अनुभव जगासमोर मांडलाय. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येकांनं वाचावा असा हा अनुभव आहे, हा अनुभव ‘बिइंग यू’ ह्या फेसबुक पेजवर प्रकाशित करण्यात आलायं. जुलै २००१ मध्ये मेजर शफिक गोरी हे शत्रूशी लढताना शहीद झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सोळा वर्षांनी त्यांच्या पत्नी शाल्मा यांनी जो अनुभव सांगितलाय तो थोडक्यात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय.

‘मी १९ वर्षांची असताना माझं मेजर शफिक यांच्याशी लग्न झालं होतं. ते लष्करात होते. आम्हाला एकमेकांसोबत फार कमी वेळ घालवता येणार हे कळल्यावर मला आणखीच अस्वस्थ वाटू लागलं होतं. प्रत्येक मुलीच्या आपल्या लग्नाबद्दलच्या काही आशा, अपेक्षा असतात तशा माझ्याही होत्या. माझ्या मनात सुरू असलेली घालमेल जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी लगेच मला सावरून घेतलं. मी लष्करी अधिकाऱ्याची पत्नी आहे, हे माझ्यातलं वेगळेपण आहे. मला खंबीर असायलाच पाहिजे याची जाणीव वेळोवेळी त्यांनी मला करून दिली. त्यांच्या सतत बदल्या होत असतं. कधी पंजाब, कधी श्रीनगर तर कधी आणखी इतर ठिकाणी. तेव्हा पूर्वीसारखे फोन नव्हते  म्हणूनच आम्ही पत्रव्यवहार करून एकमेकांशी संवाद साधत असू.

एकेदिवशी त्यांचा मला फोन आला, मुलांशी बोलण्याची त्यांची खूप इच्छा होती. पण मागे एवढा गोंधळ होता की मीच त्यांना नंतर फोन करा असं सांगितलं. तो त्यांचा शेवटचा फोन होता याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. त्यांनतर त्यांचा आवाज कधी एेकलाच नाही. वयाच्या २९ व्या वर्षी ते शहीद झाले. त्यांच्या मृत्यूची वार्ता देण्यासाठी काही अधिकारी घरी आले होते. फक्त दहा वर्षांचाच आमचा प्रवास होता. मीही कमी वयात विधवा झाले. माझ्याजवळ त्यांच्या लष्कराचा गणवेश आहे. गेल्या आठ वर्षांपासून मी तो धुतला नाही, आजही त्यांनी लिहिलेली पत्र माझ्याजवळ आहेत. ती मी नेहमी वाचते. यातून बाहेर पडून नव्यानं आयुष्य सुरू करण्याचा सल्ला अनेकांनी मला दिला, पण मी मात्र त्यांच्या आठवणीत जगण्यातचं समाधान मानते.’

शाल्मा यांची पोस्ट ३८ हजार लोकांनी शेअर केलीय. आज शाल्मा या  शहीदांच्या पत्नींसाठी काम करतात.