मेंढर : जम्मू- काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामागील दहशतवाद्यांच्या शोधासाठी हाती घेण्यात आलेली व्यापक मोहीम रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. या संबंधात अनेक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन, तसेच लष्कर आणि गुप्तवार्ता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरनकोट भागातील हल्लास्थळाला भेट दिली. लष्कराने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या भागाची हवाई टेहळणीही केली. शोधमोहिमेत लष्कराच्या पॅरा कमांडोंची पथकेही तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> इस्रायलमधील ‘अल जझीरा’ची कार्यालये बंद ;नेतान्याहू सरकारचा कामकाज थांबवण्याचा आदेश; उपकरणेही जप्त

शाहसितारनजीक शनिवारी सायंकाळी झालेल्या या हल्ल्यात हवाई दलाचे पाच जवान जखमी झाले. त्यापैकी एकाचा लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हल्ल्यात शहीद झालेल्या कॉर्पोरल विक्की पहाडे यांच्या कुटुंबीयांप्रति हवाई दलाने शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हल्ल्यानंतर जंगलात पळून गेलेल्या दहशतवाद्यांविरोधात शाहसितार, गुरसाई, सनाई व शीनडारा टॉप यांच्यासह अनेक भागांत लष्कर आणि पोलीस यांची समन्वयित संयुक्त मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जास्तीत जास्त बळी घेण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांनी एके अॅसॉल्ट रायफलींसह अमेरिकी बनावटीची एम ४ कार्बाइन आणि पोलादी गोळ्यांचाही वापर केला, अशीही माहिती त्यांनी दिली. हल्ल्यानंतर शनिवारपासूनच पूंछ जिल्ह्यात गस्त आणि वाहनांची कठोर तपासणी सुरू झाली. पूंछमध्ये सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेतली जात आहे. पूंछमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले झाले आहेत.