उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात ‘महिला सिंघम’ श्रेष्ठा सिंह यांच्या कर्तबगारीची जोरदार चर्चा आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल पोलिसांनी भाजपच्या एका स्थानिक नेत्याने पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या नेत्याला पोलीस अधिकारी श्रेष्ठा सिंह यांनी थेट जमिनीवर आणले. श्रेष्ठा सिंह यांनी भाजपच्या नेत्याला असे काही उत्तर दिले की भाजपच्या या स्थानिक नेत्याची बोलतीच बंद झाली. श्रेष्ठा सिंह यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकीकडे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची घडी बसवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कायदा धाब्यावर बसवत आहेत. बुलंदशहरमध्ये नियम धाब्यावर बसणाऱ्या एका भाजपच्या नेत्याला श्रेष्ठा सिंह यांनी धारेवर धरले. जिल्हा पंचायतीच्या सदस्या प्रवेश देवी यांचे पती प्रमोद लोधी यांना पोलिसांनी वाहन तपासणीदरम्यान अडवले. यावेळी प्रमोद लोधी यांच्याकडे ना हेल्मेट होते, ना दुचाकीची कागदपत्रे. त्यामुळेच मग लोधी यांनी अरेरावी सुरु केली. यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल लोधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करुन त्यांना अटक केली.

 

 

प्रमोद लोधी यांना कोर्टात हजर केल्यावर त्याठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते पोहोचले. यावेळी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी पावती फाडून दोन हजारांची मागणी केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यानंतर ‘भाजपच्या कोणत्याही नेत्यांच्या वाहनांची तपासणी करायची नसेल, तर तसे थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून लेखी आणा. मगच भाजप नेत्यांच्या वाहनांची तपासणी थांबवू’ असा सज्जड दम भाजप कार्यकर्त्यांना दिला. यासोबतच सरकारी कामात अडथळा आणल्यास थेट कारवाई करु, असा इशाराच भाजप कार्यकर्त्यांना श्रेष्ठा सिंह यांनी दिला.