आता हे सिद्धच झाले आहे, की ‘अच्छे दिन’ हीदेखील एक मानसिक अवस्था आहे. आपण ज्या स्थितीत असतो, त्या स्थितीशी स्वत:स जुळवून घेतले, की ‘अच्छे दिन’ या अवस्थेची अनुभूती सुरू होते. मराठमोळ्या माणसांना तर ‘चित्ती असो द्यावे, समाधान’ ही शिकवण किती तरी शतकांपूर्वीच मिळालेली असल्याने, आलेल्या प्रत्येक दिवसाला ‘अच्छे दिन’ असेच समजावे, असे बुजुर्ग सांगतात. तरीही, कोणास कोणत्या स्थितीत अच्छे दिन दिसतील, याचा काहीच नेम नाही. म्हणूनच योगविद्येचे सरकारमान्य राष्ट्रगुरू बाबा रामदेव यांना योगविद्येचे आचरण करणे हेच अच्छे दिन आहेत असे वाटते. मोदी जाहीरपणे योगसाधना करतात, म्हणूनच ते निवडणुका जिंकतात, असेही बाबांचे म्हणणे आहे. योगविद्येच्या माध्यमातून निवडणुकाही जिंकता येतात, हा त्यांचा सिद्धान्त नवाच म्हणावयास हवा. कारण निवडणुका वगैरे जिंकण्यातील योगविद्येच्या सामर्थ्यांची प्रचीती आजवर कोणासच आलेली नाही. काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या नेहरू-गांधी घराण्याच्या आजच्या पिढीने- म्हणजे राहुल गांधी यांनी योगसाधना केली असती, तर त्यांना निवडणूक जिंकता आली असती, असे बाबा म्हणतात.

पण जनतेची स्मरणशक्ती तोकडी असते; त्यामुळे वर्षभरापूर्वी रामदेव बाबांनीच राहुल आणि सोनिया गांधींना योगसाधनेचे प्रशस्तिपत्र दिले होते, हे आता कोणासच आठवत नसेल अशी बाबांची समजूत असावी. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी योगाचरण थांबविले म्हणूनच त्यांचा पक्ष निवडणुकीत अच्छे दिन पाहू शकला नाही, हा बाबांचा सिद्धान्त ऐकून आता काँग्रेस स्वयमोद्धारासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर योगसाधनेचे आदेश देणार का, याचीही शहानिशा करावयास हवी.

कारण लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसचे बुरे दिन सुरू झाले आहेत, हे सांगावयास कोणा राजकीय जाणकाराची गरज नाही. आणि काँग्रेस सध्या ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीस खुद्द काँग्रेसजनच नव्हे तर कोणीच अच्छे दिन म्हणणार नाही, हेही स्पष्टच आहे. तुम्हा-आम्हा सामान्यांच्या संस्काराप्रमाणे ‘ठेविले अनंते’ स्थितीत राहून सध्या जो काही कौल मिळाला आहे त्यातच आनंद मानण्याएवढी स्थितप्रज्ञता कोणत्याच राजकीय पक्षास नको असल्याने, बाबा म्हणतात ते अच्छे दिन पाहावयास आणि त्यासाठी प्रयत्न करण्यास प्रत्येक काँग्रेसजन उत्सुक असणार, हेही स्पष्ट आहे. राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्यापरते दुसरे कोणतेच अच्छे दिन नसल्याने, मूठभर संख्याबळानिशी केवळ संसदेच्या सभागृहात बसून हातातील मोबाइलशी चाळा करीत वेळकाढूपणा करणे कोणासही मनापासून आवडणारे नसतेच.

मात्र, संसदेच्या संयुक्त सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान जेव्हा सारे सभागृह कामकाजात मनापासून सहभागी झाले होते, त्यावेळी राहुल गांधी मात्र स्थितप्रज्ञपणे मोबाइलमग्न झाले होते. संसदेच्या कामकाजापासून एवढे अलिप्त राहावे असे त्यांना का वाटू लागले असावे, ही चिंता आता उर्वरित काँग्रेसजनांना छळत असेल. त्यामुळे त्यांना पुन्हा कामकाजात रस वाटावा, विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी हिरिरीने सरकारला आव्हान द्यावे यासाठी आता काँग्रेसजनांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

योगविद्येने मनोबल वाढते असे म्हणतात. योगविद्येने बुद्धीही तल्लख होते असेही म्हणतात. तसे असेल तर वर्षांनुवर्षे योगसाधना आणि योगविद्येचा प्रसार करणारे रामदेव बाबा ‘असे’ का म्हणाले असतील, असा प्रश्न सामान्यजनांना पडू शकतो. पण तो योगसाधनेच्या अभावाचा परिणाम असे समजावे आणि अधिक खोलात न जाता आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी थोडेसे दीर्घश्वसन करून योग दिनाचे कर्तव्य पार पाडावे, हेच ठीक!