07 March 2021

News Flash

गरिबी-  एक मानसिक अवस्था!

‘गरिबी ही मनाची एक अवस्था आहे’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. (संग्रहित छायाचित्र)

‘गरिबी ही मनाची एक अवस्था आहे’ असा विचार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही वर्षांपूर्वी देशाला दिला, पण त्याचे प्रत्यंतर येत नसल्याने देशाच्या तो फारसा पचनी पडला नव्हता. आता, आम आदमी पार्टीचे नेते आणि राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुदरलेल्या खटल्याच्या निमित्ताने राहुलजींच्या या विधानातील तथ्य अंधूकपणे सामोरे येण्यास सुरुवात झाली आहे. त्याआधी त्यांच्याच पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाओ’ ही घोषणा दिली, त्याला आता अनेक वर्षे लोटली असली तरी हे स्वप्न जपणाऱ्या जनतेच्या आशा अद्याप लोपलेल्या नाहीत, हेही एका मानसिक अवस्थेचेच लक्षण आहे. जेटलींच्या खटल्यापायी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या जवळपास साडेतीन कोटींच्या बिलाची रक्कम भरण्यास खिशात पैसा नसल्याने दिल्लीसारख्या संपन्न महानगरीच्या या केजरीवाल राजास सरकारी तिजोरीत हात घालावा लागला, तेव्हा त्यांना गरिबीच्या किती मानसिक यातना सहन कराव्या लागल्या असतील, ते गरिबीत प्रत्यक्ष जगणाऱ्यासही कळणे कठीणच आहे. जेटली यांच्यासारख्या बलाढय़ नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना केजरीवाल यांच्यासमोर वैयक्तिक स्वार्थ होता, असा विचारदेखील करणे योग्य नाही. व्यापक देशहित लक्षात घेऊन त्यांनी केलेल्या या आरोपातील द्रष्टा विचार पाहता, या आरोपानंतरच्या कायदेशीर कटकटी निस्तरण्यासाठी त्यांनी जनतेच्या खिशातून जमलेल्या निधीला हात घालावा हे तर न्याय्य आणि पारदर्शक व्यावहारिकपण आहे. तरीही वकिलाची फी देण्यासाठी सरकारी तिजोरीत हात घातल्याचा आरोप करीत आगपाखड करणे हा दुटप्पीपणा झाला. केजरीवाल हे पारदर्शक, प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचे सद्य:स्थितीत दुर्मीळ असणारे प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्व असल्याने, त्यांच्या आरोपामागील तथ्य धुंडाळून जनतेसमोर आणण्याच्या विशुद्ध हेतूने राम जेठमलानी यांच्यासारखा तगडा वकील त्यांच्यासाठी न्यायालयात उभा राहिला, यात त्यांच्याही हेतूचा प्रामाणिकपणा स्पष्ट होतो. अर्थात, कोणीही कितीही प्रामाणिकपणाने देशहिताच्या गोष्टी हाती घेतल्या तरी कायदेशीर प्रक्रिया म्हटल्यावर पैशाचा मुद्दा पुढे येतच असतो.  तीन कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम केजरीवाल यांच्याकडून राम जेठमलानी यांना येणे असल्याने, त्यांनी त्याची मागणी करावी आणि हा सारा प्रपंच देशहिताच्या हेतूने मांडला असल्याने केजरीवाल यांनी ती सरकारी तिजोरीतून अदा करण्याची व्यवस्था करावी हे साहजिकच आहे. यातूनच केजरीवाल यांच्या मानसिक गरिबीच्या जाणिवेने जेठमलानी यांचे मनपरिवर्तन झाले आणि एका गरिबाच्या मानसिक अवस्थेची ओळख एका संवेदनशील श्रीमंताला घडली. काही सिद्धान्त उदाहरणातूनच सिद्ध होत असतात, ते असे!..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:35 am

Web Title: rahul gandhi arvind kejriwal arun jaitley marathi articles
Next Stories
1 व्यासांच्या भेटी शेक्सपिअर आला!
2 लोकशाहीचा विजय असो..
3 संघर्षांची खडतर वाट..
Just Now!
X