सकाळी सकाळी गांधी टोपी, नेहरू कुर्ता अशा नेहमीच्या खादीच्या पोशाखात प्रभातफेरीवर निघालेल्या अण्णांनी संगमनेरच्या एसटी स्टँडजवळ नेहमीच्या चहावाल्याकडे आपल्या पदयात्रेचा समारोप करत वर्तमानपत्र हातात घेतले आणि काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी ‘गाव तिथे काँग्रेस’ हे अभियान राबवणार ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या घोषणेची बातमी त्यांच्या नजरेस पडली. हयात काँग्रेसमध्ये गेलेली असल्याने ती बातमी वाचून भावनांचा कल्लोळ मनात उठला अन् स्मृतींचा एक पटच त्यांच्या डोळ्यांसमोर तरळला.. स्वातंत्र्यानंतर सुमारे १३ वर्षांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर ‘गाव तिथे एसटी’ ही घोषणा गाजली आणि गेल्या काही वर्षांत ‘गाव तिथे वीज’ हा संकल्प भारत सरकारने सोडला. तो जवळपास पूर्ण झाल्याचेही जाहीर झाले. त्याच काळात ‘गाव तिथे शाळा’, ‘आरोग्य केंद्र’ अशा विविध योजना राबवण्यात आल्या. योजना कोणतीही असो, त्याची घोषणा करणारा- राबवणारा सत्ताधारी पक्ष हा प्रामुख्याने काँग्रेसच होता. महाराष्ट्रात तर १९९५ ते १९९९ आणि २०१४ ते १९ वगळता काँग्रेसचेच राज्य होते. १९७८ मध्ये पुलोद सरकार होते; पण त्यातील सर्व प्रमुख नेते हे मूळचे काँग्रेसचेच. काँग्रेसचा हा पसारा राज्य ते ग्रामपंचायत अशा सत्तेच्या वर्तुळातच संपत नव्हता. तर ग्रामीण अर्थव्यवस्थाही काँग्रेसच्या लोकांच्याच हाती होती. साखर कारखाना कोणाचा- काँग्रेस नेत्यांचा. दूध संघ कोणाचा- काँग्रेस नेत्यांचा. कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण- तर काँग्रेसचेच नेते. शाळा-महाविद्यालय कोणाचे- तर काँग्रेस नेत्यांचे. इतकेच काय तर या शाळा-महाविद्यालयांच्या पटांगणावर वाट्टेल तसे उगवणारे गवत कोणते- तर तेही काँग्रेस गवत. म्हणूनच दिल्लीपासून ते शहर-गावांतील गल्लीपर्यंत सर्वत्र काँग्रेसच काँग्रेस. शत-प्रतिशत असा कोणताही संकल्प न सोडता व सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी भाजप यासारखे कसलेही अभियान न चालवता काँग्रेस सर्व भारत-महाराष्ट्र व्यापून होती.. मनात आठवणींचा कल्लोळ उठलेला असतानाच ‘‘काँग्रेसवर काय वेळ आली..’’ या ‘चहावाल्या’च्या वाक्यामुळे अण्णांची तंद्री भंग पावली. शेजारच्यांसह त्याची मस्त चर्चा रंगली होती. ‘‘आपले बाळासाहेब म्हणतात गाव तिथे काँग्रेस अभियान राबवणार. एक वेळ अशी होती की पेपरातल्या लेखांत म्हणायचे की काँग्रेसचा कार्यकर्ता नाही असे देशात एक गाव नाही.. पण २०१४ च्या त्या उन्हाळ्यात सगळं काँग्रेस गवत करपून गेलं.. मागच्या महिन्यात तर टीव्हीवर दाखवत होते की ते अहमद पटेल त्या हरियाणाच्या भूपिंदर हुडांना विचारत आहेत की पार्टी गयी कहाँ? आता त्या मुंबईतल्या वाघाने पंजा मारला म्हणून काँग्रेस सत्तेत आली, बाळासाहेबही मंत्री झाले. पण तेवढय़ाने काय होणार? उडून गेलेली पाखरे पुन्हा येतात काय?’’ ही गरमागरम चर्चा ऐकताना अण्णांच्या सहजच मनात आले : या गाव तिथे काँग्रेसची सुरुवात प्रवरानगर-लोणीमधून होणार की कसं? आणि गालातल्या गालात हसत त्यांनी चहाचा कप तोंडाला लावला.