scorecardresearch

रेल्वेत चहा, कॉफी महागली

रेल्वेतील खाद्यपदार्थ आणि चहा, कॉफीच्या दरांमध्ये २००६ मध्ये वाढ करण्यात आली होती.

(संग्रहित छायाचित्र)
पुणे : रेल्वेमधील चहा आणि कॉफीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली असून, सात रुपयांना मिळणाऱ्या या पेयांचा दर आता दहा रुपये झाला आहे. दरवाढ केल्यामुळे आता तरी चांगल्या दर्जाचा चहा, कॉफी प्रवाशांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

रेल्वेतील खाद्यपदार्थ आणि चहा, कॉफीच्या दरांमध्ये २००६ मध्ये वाढ करण्यात आली होती. त्या वेळी चहा आणि कॉफीसाठी सात रुपये दर ठेवण्यात आले होते. त्यानंतर मोठय़ा कालावधीनंतर दरवाढ करण्यात आली आहे. रेल्वेत आता दहा रुपयांमध्ये १५० मिली लिटर चहा किंवा कॉफी मिळणार आहे. दरवाढीबाबत प्रवाशांची नाराजी नाही, मात्र पेयांच्या दर्जाबाबत रेल्वेने लक्ष द्यावे, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा याबाबत म्हणाल्या की, चहा आणि कॉफीच्या दरात वाढ ठीक आहे. परंतु, आता रेल्वेने दर्जाकडे लक्ष दिले पाहिजे.

रेल्वेत मिळणारा चहा किंवा कॉफी अनेकदा पिण्याच्या लायकीचे नसतात. चहापानाबरोबरच खाद्यपदार्थाचा दर्जाही राखला पाहिजे. रेल्वे गाडय़ांबरोबरच स्थानकाच्या आवारात मिळणाऱ्या चहा, कॉफीच्या दर्जाबाबतही रेल्वेने लक्ष घातले पाहिजे.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railways hikes price of tea and coffee served in trains