मालिका या नायिकाप्रधान असतात, असं म्हटलं जातं. पण, आता मालिकांमध्ये खलनायिकांनाही नायिकांइतकंच महत्त्व येऊ लागलं आहे. खलनायिकांशिवाय मालिका अपूर्ण वाटतात, असंच चित्र सध्या दिसून येतंय. एकताच्या मालिकांपासून खलनायिकांची निर्मिती झाली. ‘क्यूँकी साँस भी कभी बहू थी’मधील मंदिरा, ‘कसोटी जिंदगी की’मधील कोमोलिका, ‘कहीं किसी रोज’मधील रमोला अशा अनेक खलनायिकांनी डेली सोपचा सुरुवातीचा काळ अक्षरशः गाजवला होता. भडक मेकअप, नागमोडी वळणाच्या टिकल्या, भरजरी साड्या अशा पेहरावात त्या मालिकेत वावरायच्या. खलनायिका ही भूमिका त्यांनी मालिकांमध्ये प्रस्थापित केली. हिंदी मालिकांच्या अनेक गोष्टी हळूहळू मराठीकडे सरकल्या. मराठी खलनायिकांचं ‘दिसण्या’पेक्षा ‘असणं’ जाणवतं. हिंदीमधल्या भडक दिसणाऱ्या खलनायिकांना मराठी मालिकांमध्ये मात्र तुलनेत साधेपण दिलं गेलं. तरीही त्या प्रेक्षकांवर छाप पाडण्यात यशस्वी होत असल्याचे आज पाहावयास मिळते. प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडण्यात यशस्वी ठरलेल्या अशाच एका खलनायिकेला तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेले अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर अल्पावधीत रसिकप्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध झाली.

वाचा : पूजा सावंतचा बोल्ड लूक

धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे. ‘माझिया प्रियाला..’ मध्ये तिने अगदी खलनायिकी अशी नाही पण तशीच काहीशी छटा असणारी भूमिका साकारली होती. तर ‘गंध फुलांचा…’ मालिकेत ती अगदी सोज्ज्वळ भूमिकेत होती. पण, नंदिता वहिनीच्या भूमिकेने धनश्रीला आज वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. मात्र, या प्रसिद्धीमुळे अनेकदा नंदिताला म्हणजेच धनश्रीला काही लोकांचा रागही सहन करावा लागत आहे. मात्र हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचे धनश्रीला वाटते. याविषयी धनश्री म्हणाली की, माझिया प्रियाला.. मध्ये मी साकारलेली भूमिका पूर्णपणे खलनायिकेची अशी नव्हती. त्या व्यक्तिरेखेमध्ये आलेल्या असुरक्षिततेमुळे ती काहीशी खलनायिकेप्रमाणे वागते. पण, आता मी जी भूमिका साकारतेय ते पूर्णपणे खलनायिकेची आहे. ही भूमिका साकारल्यानंतर मला चांगले-वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आले.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

एकदा मी मालिकेतील इतर कलाकारांसोबत मॉलमध्ये गेले होते. तिथे एक आजी म्हणाल्या की, मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. त्या माझ्याकडे बघून बोलल्यामुळे मला वाटलं की त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचा आहे. त्यासाठी मी पुढेही सरसावले पण, तेव्हा त्या लगेचच म्हणाल्या की, धाकट्या सूनबाईंसोबत मला फोटो काढायचा नाहीये. त्याक्षणी मला थोडसं खटकलं. पण खरंतर हा मालिकेतील माझ्या भूमिकेला मिळालेला न्याय होता. ही माझ्या अभिनयाला मिळालेली खरी दाद होती असं मी म्हणेन. इतकंच नव्हे तर एका व्यक्तिने मला सोशल मीडियावर, नंदिता तुम्ही प्लीज अशा वागू नका, तुमच्यामुळे आमचं घर बरबाद होतंय, तुम्हाला कळतंय का? असा मेसेज केला होता. नुकताच मला एका महिलेचा फोन आला होता. तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही छान काम करता. तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मी तेव्हा आश्चर्यचकित झाले. मग मी त्यांना विचारलं काय शिकलात तुम्ही? त्यावर त्या म्हणाल्या, कसं वागू नये हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तिच्या तोंडावर गोड-गोड बोलता आणि त्याच माणसाची पाठ फिरल्यानंतर तुम्ही कसं वागता हे मी शिकलेय. अशी काही माणसं माझ्या आयुष्यातही असू शकतात हे मला कळलं, तेव्हा मी यापुढे काळजी घेईन असेही त्या म्हणाल्या. असे एक ना अनेक अनुभव मला या मालिका सुरु झाल्यानंतर आले आणि अजूनही येत आहेत.